शासन उपक्रम फोटोसेशनचा फार्स ; माजी नगराध्यक्षांची टीका
यावल । ‘स्वच्छता हीच सेवा’ असा संदेश देणार्या पंधरवाड्याची शुक्रवारपासून पालिकेच्या वतीने सुरुवात करण्यात आली. शासनाच्या उपक्रमाचा केवळ फोटो सेशन करून फार्स करणार्या पालिका प्रशासनाच्या या कार्यक्रमावर मात्र माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक अतुल पाटील यांच्यासह सात नगरसेवकांनी बहिष्कार टाकला. स्वच्छतेचा ४५ लाख रूपयात मक्ता देऊनही शहर स्वच्छ ठेवण्यात पालिका प्रशासनाला अपशय येत असल्याचा आरोप त्यांनी प्रसंगी केला.
२ ऑक्टोबरपर्यंत चालणार पंधरवडा
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्वप्नातील स्वच्छ भारताची संकल्पना साकारण्यासाठी महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त स्वच्छ भारत उपक्रमाची व्यापक जनचळवळ उभारण्याचे दृष्टीने राज्य शासनाच्या वतीने राज्य भरात १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत ‘स्वच्छता हीच सेवा’ ही मोहिम राबविण्यात येत आहे. शुक्रवारी पालिकेच्या सभागृहासमोर नगराध्यक्ष सुरेखा कोळी, उपनगराध्यक्ष प्रा. मुकेश येवले, पोलीस निरीक्षक डी.के.पारदेशी यांच्या उपस्थितीत पंधरवड्याचा शुभारंभ झाला. ‘स्वच्छता हीच सेवा’ असे ब्रीदवाक्य असलेले फलक घेऊन सकाळी ११ वाजता नगरपालिका कार्यालय ते बुरुज चौकातील मुख्य रस्त्यापर्यंत सफाई करण्यात आली. या पंधरवड्यात तहसील कार्यालयाचा परिसर, शहरातील बोरावल गेट, गाडगे नगर झोपडपट्टी, भिल्ल वस्ती, मशीद या भागात स्वच्छतेचे नियोजन आहे.
पालिकेकडे ५२ सफाई कामगार आहे व सोबत शहर स्वच्छतेसाठी तब्बल ४५ लाखांचा मक्ता देण्यात आला आहे. असे असताना शहरात पाहिजे त्या प्रमाणात स्वच्छता होत नाही. विस्तारीत भागात सर्वत्र अस्वच्छता आहे तेव्हा पालिका प्रशासनाला वारंवार कळवूनदेखील स्वच्छता केली जात नाही. शासन उपक्रम म्हणून केवळ फोटो सेशन करून कर्तव्याचा विसर करणार्या प्रवृत्तीला आपला विरोध आहे. – अतुल पाटील, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक यावल