स्वच्छतेच्या कार्यासाठी लोकांची मनोधारणा बदलणे आवश्यक

0

पुणे । स्वच्छ भारत अभियानामध्ये पुण्यातील स्वच्छ पुणे, स्वच्छ भारत संस्थेद्वारे जे कार्य होत आहे, त्याद्वारे लोकांच्या मनोधारणा बदलत आहेत. जेव्हा धारणा बदलेल तेव्हा स्वच्छतेचे कार्य मोठ्या प्रमाणात पसरेल. नवयुवकांनी जे कार्य हाती घेतले आहे, त्याचा परिणाम लवकरच सर्वांना दिसेल, असे उद्गार डॉ. विश्वनाथ कराड एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे अध्यक्ष डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी शुक्रवारी काढले.

स्वच्छ पुणे, स्वच्छ भारत या सामाजिक संस्थेतर्फे दोन तास स्वच्छ पुण्यासाठी प्रयास करणार्‍या संस्थांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी स्वच्छ पुणे, स्वच्छ भारत संस्थेचे अध्यक्ष पुनीत शर्मा, रोटरी क्लब पुणेचे राजेश बहल, सीड इन्फोटेकचे सीईओ नरेंद्र बर्हाटे, रोटरी क्लबचे नरेंद्र बक्षी, डॉ. एल. के. क्षीरसागर व डॉ. संजय देशमुख सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी पुण्यातील 21 संस्थांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्यात ग्लोबल शेपर्स, लेट्स राइज, दिया फाउंडेशन, पीटीसी सॉफ्टवेयर इंडिया प्रा. लि., सीड इन्फोटेक आणि कॉग्नीझन्ट इ. यांचा समावेश आहे. त्याच प्रमाणे जयंत या दिव्यांग विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार केला गेला.

निस्वार्थ लोकांची गरज
सर्वात मोठी धारणा मनाची असते. मन बदलले तर सर्व काही आपोआपच चांगले घडत जाते. विश्वात सुख-शांती व समाधान आणावयाचे असेल तर ते फक्त विज्ञान आणि अध्यात्माचा समन्वयानेच मिळू शकते. कोणतेही कार्य करण्यासाठी चारित्र्यवान, निस्वार्थ अशा व्यक्तींची गरज असते, असे कराड यांनी बोलताना पुढे सांगितले.

विविध कंपन्यांचे श्रमदान
गेल्या अडीच वर्षापासून आम्ही प्रत्येक रविवारी शहरात स्वच्छतेचे कार्य करतो. त्यामध्ये शहरातील विविध कंपन्या, संस्था, व्यक्ती स्वतः श्रमदान करून पुण्याची शोभा वाढविण्यास सहयोग करतात. स्वच्छ भारत अभियानाला आमच्याकडून होईल तेवढा सहयोग देण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत, असे पुनीत शर्मा यांनी सांगितले. या वेळेस प्रा. एल. के. क्षीरसागर यांनी स्वच्छतेचे महत्व समजावून सांगितले. त्याचप्रमाणे आळंदी येथे एमआयटीने केलेल्या कार्याची माहिती दिली. सत्या नटराजन व अनुजा दहिकणे यांनी सूत्रसंचालन केले. प्राची देव यांनी आभार मानले.