स्वच्छतेत पुणे, पिंपरी-चिंचवडचे स्थान घसरले!

0

नवी दिल्ली : स्वच्छते संदर्भातील सरकारच्यावतीने करण्यात आलेल्या सर्वेक्षणात देशातील ‘टॉप 10’ स्वच्छ शहरांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीत आठव्या स्थानावर नवी मुंबईचा समावेश झाला आहे. केंद्रीय मंत्री वेंकय्या नायडू यांनी यासंदर्भातील यादी गुरुवारी जाहीर केली. या यादीत पुणे शहर तेराव्या क्रमांकावर तर पिंपरी-चिंचवड शहर 72व्या क्रमांकावर घसरले आहे. गेल्यावर्षी स्वच्छ शहरांच्या सर्वेक्षणासाठी देशातल्या 73 शहरांचा समावेश करण्यात आला होता. यामध्ये पहिल्या 10 शहरांत नवी मुंबई आणि पिंपरी चिंचवड या दोन शहरांचा समावेश होता.

अस्वच्छ शहरांच्या यादीत भुसावळ दुसरे
‘स्वच्छ भारत’ ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्त्वाकांक्षी योजना आहे. ‘स्वच्छ सर्वेक्षण 2017’ अंतर्गत या योजनेचा आढावा घेण्यात आला. त्यामध्ये देशातील 434 शहरातून माहिती घेण्यात आली. तर 37 लाखांहून अधिक नागरिकांनी सहभाग घेतला. या सर्वेक्षणाबाबत गुरुवारी केंद्रीय मंत्री वेंकय्या नायडू यांनी माहिती दिली. सरकारच्यावतीने घेण्यात आलेले हे सर्वात मोठे सर्वेक्षण होते, असे नायडू यांनी सांगितले. नायडू यांनी देशभरातील ‘टॉप 10’ स्वच्छ शहरांची यादी प्रसिद्ध केली. या यादीत इंदूर सर्वांत वरच्या स्थानावर आहे. तर नवी मुंबईला आठवे स्थान मिळाले आहे. दुसरीकडे, अस्वच्छ शहरांच्या यादीत महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील भुसावळ हे दुसर्‍या क्रमांकावर आहे. तर उत्तर प्रदेशातील गोंडा हे सर्वात शेवटी आहे. तसेच, सर्वात अस्वच्छ शहरांमध्येसुद्धा 20 शहरे ही एकट्या उत्तर प्रदेशातील आहेत.

स्वच्छतेच्या बाबतीत महाराष्ट्र पिछाडीवर..
केंद्र सरकारने यावर्षी केलेल्या स्वच्छता सर्वेक्षणात मैसूरला मागे टाकत मध्यप्रदेशच्या इंदूर या शहराने अव्वल, तर भोपाळने दुसरा क्रमांक पटकावला आहे. जाहीर करण्यात आलेल्या 434 शहरांच्या यादीत महाराष्ट्रातील 44 शहरांचा समावेश आहे, पण टॉप-100 मध्ये फक्त सात शहरे जागा मिळवू शकली आहे. टॉप-10 मध्ये तर एकट्या नव्या मुंबईला स्थान मिळाले. राज्यातील नऊ शहरे तर 300च्या पलीकडे आहेत. भुसावळला शेवटून दुसरे, अर्थात 433वे स्थान मिळाले. त्यामुळे स्वच्छतेच्या बाबतीत महाराष्ट्र पिछाडीवरच असल्याचे चित्र पुन्हा समोर आले. स्वच्छ शहरांमध्ये पहिल्या 50 पैकी 12 शहरे ही गुजरातमधील आहेत.