स्वच्छतेवर कोट्यवधींचा खर्च करुन कचर्‍याचे ढीग कायम

0

कल्याण । स्वच्छ भारत योजनेबाबत जनजागृतीसाठी केडीएमसी पालिका प्रशासनाकडून विविध योजना राबवल्यानंतरही शहरात कचर्‍याचे ढीग कायम असल्याने योजना निष्प्रभ ठरल्याचेच दिसून येत आहे. त्यात आता पुन्हा पालिका प्रशासनाकडून विविध उपक्रम राबविण्याची तयारी करण्यात आली असून त्यासाठी कोट्यवधींचा खर्च करण्यात येणार आहे. मोदी सरकारने देशभरात स्वच्छ भारत अभियानाचा डंका पिटल्यानंतर स्वच्छ भारत अभियान सर्वसामान्य नागरिकांवर लादण्यात आला. हा कर न चुकता वसूल केला जात असला तरीही त्यामोबदल्यात कोणत्याही प्रकारची स्वच्छता नागरिकांना दिसत नसून रस्त्याच्या मधोमध ठेवलेल्या कचराकुंड्या कचर्‍याने काठोकाठ भरले आहे.

एकीकडे प्रशासनाच्या सर्व योजना निष्प्रभ ठरल्या असताना पुन्हा एकदा स्वच्छ भारत अभियानाबाबत जनजागृती करण्याची तयारी पालिका प्रशासनाकडून करण्यात आली आहे. नागरिकांनी ओला, सुका कचरा वेगळा करावा असे आवाहन करत ओला, सुका कचरा वेगळा करणार्‍या सोसायट्यांना मालमत्ता करात काही प्रमाणात सूट देण्याचे आश्‍वासन देखील देण्यात आले आहे. मात्र तरीही नागरिकांवर त्याचा फारसा परिणाम झालेला नसताना आता नागरिकडकडून स्वच्छतेची अपेक्षा ठेऊन त्यांच्यात स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी आधीच खडखडाट असलेल्या तिजोरीतून सुमारे दीड कोटी रुपयांची उधळपट्टी केली जाणार आहे.

नागरिकांना दिलासा द्या
केवळ जनजागृतीवर कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करण्यापेक्षा शहरातील सुका आणि ओला कचरा वेगळा करून हा कचरा नियमित उचलून नागरिकांना दिलासा देण्याची मागणी होत आहे. स्वच्छतेची अंमलबजावणी किती प्रमाणात होईल याबाबत प्रशासन साशंक असले तरीही कर्तव्यपूर्तीसाठी हा उपक्रम राबविला जाणार आहे. त्यामुळे जनजागृतीवर कोट्यवधी रुपयाची उधळपट्टी करण्यापेक्षा शहरातील सुका आणि ओला कचरा वेगळा करून हा कचरा नियमित उचलून नागरिकांना दिलासा देण्याची मागणी होत आहे.