जळगाव। शहरात काल रविवारी दुपारी झालेल्या मुसळधार पावसाने अनेक भागात तसेच घरांमध्ये पाणीच पाणी झाले होते. जे भाग पाण्यामुळे बाधीत झाले होते. त्यान ठिकाणी तुंबलेले पाणी काढण्यासाठी व स्वच्छतेसाठी महापालिकेची पथके काल सायंकाळपासून रस्त्यावर उतरली आहेत. बांधकाम व आरोग्य विभागाच्या जेसीबीच्या मदतीने ही कामे सुरु आहेत. त्याचबरोबर गटारींचे ब्लॉक व नाल्याचे ब्लॉक मोकळे करण्यात येत आहे.
पावासाचे पाणी साचले
जळगाव शहरात काल रविवारी (दि.20) दुपारी पावणेतीन ते चार वाजे दरम्यान झालेल्या मुसळधार पावसाने अवघे जळगाव शहर जलमय केले होते. पावसामुळे शहरातील अनेक मुख्य रस्त्यावर देखिल घुडघाभर पावासाचे पाणी साचले होते. त्यामुळे वाहन चालवतांना देखिल कसरत करावी लागत होती. सायंकाळी पाऊस थांबल्यावर मुख्य रस्त्यांवरील पावासाचे पाण ओसरले. मात्र, सखल भागात व नाल्याचे पाणी घुसलेल्या भागातील पाणी मात्र साचून असल्याने या भागात आता डांसांचा पार्दुभाव वाढून साथीचे आजार फैलावण्याची भिती निर्माण झाली आहे.
चार्या काढून पाणी केले वाहते
महापालिकेच्या बांधकाम व आरोग्य विभागाकडून काल सांयकाळपासून व आज पुन्हा सकाळपासुन तुंबलेले पाणी चार्या करुन वाहते करण्यासाठी पथके कार्यरत करण्यात आली आहेत. यासाठी दोन जेसिबी मशिन या भागांमध्ये पाठविण्यात आली आहेत. काही भागात बांधकाम साहीत्य वापरुन चार्या करण्याचे काम सुरु असल्याची माहीती शहर अभियंता सुनिल भोळे यांनी दिली. यासह शहरात पावसामुळे नाल्याचे व गटारीचे पाणी रस्त्यावर व वस्त्यांमध्ये घुसून त्यासोबत कचरा देखिल बाहेर आला आहे. त्या दृष्टीने आरोग्य विभागाकडून विशेष स्वच्छतेची कामे हाती घेण्यात आल्याची माहीती आरोग्य अधिकारी डॉ.विकास पाटील यांनी दिली.
या ठिकाणी साचले पाणी
पावसामुळे म्हाडा कॉलनी, आशा बाबा नगर, वाघ नगर परिसरातील योजना अर्पाटमेंट, कानळदा रोडवरील सत्यम नगर, गोपाळ पुरा, रामेश्वर कॉलनी व शाहू नगर या भागातील अनेक घरांमध्ये देखिल पावासाचे पाणी घुसले होते. तर काही घरांना पाण्याचा वेढा पडला होता. तर ख्वॉजामिया चौक ते गणेश कॉलनी रस्ता, नविपेठेतील रस्ते, बालाजी चौक भागातील पावासाचे पाणी वाहते करण्याचे काम सुरु आहे.