पुणे । स्वच्छतेसाठी आणि पर्यावरणाच्या संरक्षणासाठी पैसा, तंत्रज्ञान उपलब्ध होऊ शकेल; परंतु याकरिता नागरिकांची मानसिकता बदलणे गरजेचे असल्याचे मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी व्यक्त केले. ‘विकासासाठी शाश्वत पर्यटन’ या विषयावरील ’वनराई’च्या वार्षिक विशेषांकाचे प्रकाशन डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते झाले. यावेळी रवींद्र धारिया, श्रीपाल सबनीस, कृष्णकुमार गोयल, नितीन देसाई आदी उपस्थित होते.
डॉ. माशेलकर म्हणाले, जगात भारत हा श्रीमंत देश असून तिथे गरीब लोक राहतात, असे म्हटले जाते. भारताची ही श्रीमंती म्हणजे येथील नैसर्गिक सौंदर्य, जैवविविधता, पर्यटन स्थळे, ही श्रीमंती असली तरी येथील गरिबांना रोजगार मिळाला पाहिजे आणि तो शाश्वत असला पाहिजे. गोव्यासारख्या शहरात निसर्ग पर्यटन आणि आरोग्य पर्यटनासारख्या संकल्पना जोर धरू लागल्या आहेत. ज्यातून पर्यावरणाचे रक्षण होईल आणि स्थानिकांना रोजगार लाभेल. त्यासाठी लोकसहभाग ही बाब अत्यावश्यक आहे. त्याचबरोबर लोकांची मानसिकता बदलविणे गरजेचे आहे. डॉ. सबनीस म्हणाले, भारतात बेरोजगारीमुळे शहरीकरण वाढत चालले आहे. बेरोजगारीमुळे धार्मिक व राजकीय क्रौर्य निर्माण होते. त्यामुळे पर्यावरणपूरक पर्यटन विकास आवश्यक असून, तिथे स्थानिकांना व छोट्या व्यावसायिकांना रोजगार मिळाला पाहिजे.