जळगाव । नामांकित व्यक्ती, शालेय विद्यार्थी, शासकीय कर्मचारी यांच्या माध्यमातून स्वच्छता अभियान राबवित शासन स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत आहे. नव्याने तयार करण्यात आलेल्या पाचशे व दोन हजाराच्या नोटांवरदेखील ‘एक कदम स्वच्छता की ओर’ असा संदेश असून स्वच्छतेविषयी जागृतीचा प्रयत्न शासनाने केला आहे. बुधवारी शहरात राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेत शहरातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. शहरातील विविध ठिकाणी स्वच्छता मोहिम राबविण्यात आली.
नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान
रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यात असलेल्या रेवदंडा येथील डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या सौजन्याने स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. ही मोहिम पंतप्रधान नरेद्र मोदी व राज्यपाल सी.विद्यासागरराव यांनी नियुक्त केलेल्या स्वच्छतादूत डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अण्णासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या 16 नोव्हेबर 2014 रोजीच्या स्वच्छता अभियानाची नोंद लिमका बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे. महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर 148 शहरामध्ये सुमारे 1434 सरकारी कार्यालये, 115 रेल्वे स्टेशन व 2720 कि.मी. लांबीचे शहरी रस्ते, पोलीस ठाणे, बस स्थानके, रुग्णालये येथे स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. स्वच्छतेसाठीचे साहित्य प्रतिष्ठानच्या वतीने पुरविण्यात आले. अभियानात डॉ.अप्पासाहेब धर्माधिकारी, उमेश धर्माधिकारी, सचिन धर्माधिकारी, राहूल धर्माधिकारी आदी सहभागी झाले.
स्वच्छतेविषयी संदेश
स्वच्छतेचे संदेश मराठी, हिंदी, इंग्रजीत देण्यात आले. स्वच्छता शिका, आरोग्य जिंका, स्वच्छता असे जेथे, आरोग्य वसे तेथे, प्लास्टिक हटवा, पर्यावरण वाचवा, स्वच्छ भारत सुंदर भारत, स्वच्छता असे ज्याचा घरी, आरोग्य तेथे वास करी, स्वच्छता दारोदारी, आरोग्य घरोघरी, स्वच्छता असे जिथे जिथे, लक्ष्मी वसे तिथे तिथे, प्रकृती का न करे हरण, आओ बचाये पर्यावरण!, जन जन का यही है नारा, स्वच्छ भारत है लक्ष्य हमारा!, पर्यावरण का रखे ध्यान, तभी बनेगा देश महान!, स्वच्छता उन्नती का आधार है, लंबे जीवन का सार है!, हम सबका एक ही नारा, साफ सुथरा हो देश हमारा!, सभी रोगों को एक ही दवाई, घर में रखो साफ सफाई!, सफाई अपनाईये, बीमारी हटाईये! असे संदेश देण्यात आले.
जिल्हा रुग्णालयाची पाहणी:
जिल्हा रुग्णालयातील समस्या मोठी आहे. रुग्णालयात दररोज अनेक रुग्ण येतात. त्यामुळे रुग्णालयाची स्वच्छता अधिक महत्त्वाची आहे. शहरात राबविण्यात आलेल्या मोहिमेत जिल्हा रुग्णालयाचीही स्वच्छता करण्यात आली. डॉ.किरण पाटील, सुनिल भांमरे यांनी जिल्हा रुग्णालयातील स्वच्छतेची पाहणी करुन परिस्थिती जाणून घेतली.
जिल्हाधिकारी कार्यालय:
या मोहिमेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी शहरातील नागरिक एकत्र आले होते. परिसरातील वन विभाग कार्यालय, जिल्हा उपनिबंधक कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग, तहसिल कार्यालय, पोलीस अधिक्षक कार्यालय, फेडरेशन परिसर, शिवाजीनगर परिसराची स्वच्छता करण्यात आली. राज्य परिवहन कार्यालयातील अधिकारी विकास बर्हाटे, इंगळे, शिरोडे यांनी पाहणी केली.
धरणगाव शहर
या अभियानात धरणगाव शहरातील नागरिकांनीही सहभाग नोंदविला. शहरातील नागरिकांसमवेत सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, नगराध्यक्ष सलीम पटेल, न्या. सचिन भावसार, तहसिलदार कैलास कडलक, मुख्याधिकारी सपना वसावा, पोलीस निरीक्षक डी.ए.पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील, गोपाल चौधरी आदींनी सहभाग नोंदविला.
जामनेर येथे मंत्र्यांनी घेतला सहभाग
जामनेर शहरात या अभियानात जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी सपत्नीक सहभाग घेतला. नानासाहेब धर्माधिकारी यांना अभिवादन करुन स्वच्छता अभियानास सुरुवात करण्यात आली. यावेळी नगरपरिषद चौकात स्वच्छता करण्यात आली. नगराध्यक्ष साधना महाजन, पंचायत समिती सभापती आरती लोखंडे, तहसिलदार नामदेव टिळेकर, प्रभारी गटशिक्षणाधिकारी श्रीकृष्ण इंगळे, मुख्याधिकारी शोभा बाविस्कर, कॉग्रेस महिला आघाडीच्या जोत्स्ना विसपुते व सर्व नगरसेवक उपस्थित होते.
यांनी घेतला सहभाग:
शहरात राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेत महापौर नितीन लढ्ढा, आमदार सुरेश भोळे, आयुक्त जीवन सोनवणे, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल मुंडके, नगरसेवक नितीन बरडे, वासुदेव सोनवणे, प्रमोद नाईक आदींसह शहरातील विविध अधिकारी, कर्मचारी , सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
380 टन कचरा जमा
जळगाव शहरासह जिल्ह्यातील धरणगाव, जामनेर, एरंडोल आदी ठिकाणी महास्वच्छता अभियान राबविण्यात आला. संपुर्ण जिल्ह्यातून 379.85 टण कचरा जमा करण्यात आला. जळगाव तालुक्यात 4 हजार 280 स्वयंसेवकांनी 198.75 टन, जामनेर तालुक्यातील 1 हजार 757 स्वयंसेवकांनी 104.6 टन, धरणगाव तालुक्यातील 1 हजार 236 स्वयंसेवकांनी 35 टन, एरंडोल तालुक्यातील 709 स्वयंसेवकांनी 41.5 टन कचरा जमा केला. या कचर्याचेे शहराबाहेरील डंपींग ग्राऊडवर विसर्जन करण्यात आले. जळगाव शहरातील कचरा निमखेडी परिसरातील डंपींग ग्राऊंडवर टाकण्यात आला.