पुणे । आजकाल कुठेच शिस्त पाळली जात नाही. सुशिक्षितही वाहतुकीचे नियम सर्रास तोडताना दिसतात. त्याचबरोबर परिसर अस्वच्छ ठेवतात. त्यामुळे लहानपणापासूनच मुलांना शिस्त लावली व स्वच्छतेचे योग्य धडे दिले तर देशात घाण दिसणार नाही. खर्या अर्थाने भविष्यात देशाचा विकास होईल असे मत सी.डी. शेठ यांनी व्यक्त केले.
तीन वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारताची संकल्पना देशासमोर मांडली. तेव्हापासून सर्वत्र स्वच्छ व निर्मळ ग्राम तयार करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. गावाचा सर्वांगीण विकास करून स्वच्छ व हरित गावाची निर्मिती करण्याच्या उद्देशाने ‘द इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ लायन्स क्लब डिस्ट्रिक्ट 323 डी 2’च्या वतीने स्वच्छ आणि हरित ग्राम उपक्रम महाराष्ट्रातील गावांमध्ये राबविण्यात आला. या उपक्रमाअंर्तगत ‘स्मार्ट व्हिलेज’मध्ये 48 गावांचा समावेश होता. त्यामधून निवडलेल्या 4 गावांना ‘स्वच्छ आणि हरित ग्राम 2016-17’ या पुरस्काराने गौरविण्यात आले.
स्वच्छ व हरित ग्राम या उपक्रमाचा पहिला क्रमांक वाळुंज या गावाने पटकावला. या गावाला लायन्स क्लबच्या सारसबाग शाखेने दत्तक घेतले होते. तर दुसरा क्रमांक कान्हेवाडी (लायन्स क्लब, भोसरी), तिसरा क्रमांक कोळेविहरे (लायन्स क्लब, शंकर नगर) यांनी मिळवला तर अडवली (लायन्स क्लब, मैत्री) या गावाने चौथा क्रमांकांचे बक्षीस मिळवले. याप्रसंगी अनिल मंद्रुपकर, डॉ. चंद्रहास शेट्टी, किशोर मोहोळकर, आनंद आंबेकर, वाळुंजचे सरपंच अनिल इंगळे, उपसरपंच राहुल येवले, कोळेविहरेचे सरपंच विठ्ठल खैरे, अडवलीचे सरंपच गोपाळ इंगुळकर आदी उपस्थित होते. मंद्रुपकर यांनी प्रास्ताविक केले, तर सूत्रसंचालन रक्षा शिंदे यांनी केले.