‘स्वच्छ’ कॅलेंडरसाठी 12 लाखांचा खर्च

0

पिंपरी-चिंचवड : केंद्र सरकारमार्फत 4 जानेवारीपासून शहरात स्वच्छ सर्वेक्षण सुरु केले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये स्वच्छता विषयक प्रबोधन संदेश देण्यासाठी कॅलेंडर छापण्यात येणार आहेत. त्यासाठी येणार्‍या 12 लाख 60 हजार रुपये खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली. दरम्यान, स्वच्छ सर्वेक्षणाच्या जनजागृतीसाठी या अगोदर 18 लाख रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.

कॅलेंडरचा आकार ए-4
नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयक तसेच स्वच्छ सर्वेक्षण 2018 विषयक जागृती तसेच स्वच्छ अभियानाची माहिती, प्रसार होणे आवश्यक आहे. स्वच्छ सर्वेक्षणामध्ये यासाठी गुणांकन देण्यात आलेले आहे. याची जाहिरात करण्यासाठी वृत्तपत्रांमध्ये जाहिराती देण्यात येणार आहेत. त्यासाठी सात लाख 50 हजार रुपये खर्च येणार आहे. तसेच कॅलेंडरमध्ये स्लोगन, छायाचित्र टाकण्यात येणार आहेत. कॅलेंडर दिसायला व्ह्यूजीएबल, ए-4 आकारामध्ये घरी लावता येईल, असे छापण्यात येणार असून त्यासाठी चार लाख 50 हजार रुपये खर्च करणार आहे. यासाठी येणार्‍या एकूण 12 लाख 60 हजार रुपये खर्चास स्थायी समितीने आयत्यावेळी मान्यता दिली.

उधळपट्टीचा आरोप
दरम्यान, स्वच्छ सर्वेक्षणाच्या जनजागृतीवर पालिकेने याअगोदर 17 लाख 73 हजार रूपये खर्च केले आहेत. आता आणखीन स्वच्छ सर्वेक्षणावर 12 लाख 60 हजार रुपये खर्च केले जाणार आहेत. त्यामुळे स्वच्छ सर्वेक्षणाच्या जनजागृतीवर पालिका पैशांची उधळपट्टी करत असल्याचा आरोप, जोर धरत आहे.