स्वयंसेवी संस्था, नागरिकांचा थेट सहभाग वाढविणार
पुणे : केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानामध्ये पुणे शहराचा स्वच्छतेचा दर्जा 10 वरून 37 क्रमांकावर घसरला. यानंतर प्रशासनावर सर्व स्तरांतून जोरदार टीका झाली. यामुळे प्रशासनाने आता स्वच्छ पुणे शहरासाठी ‘मिशन 2020’ हाती घेतले आहे. यामध्ये पुणे शहर खर्या अर्थाने स्वच्छ करण्यासाठी अधिकारी, कर्मचार्यांसह विविध स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांचा थेट सहभाग वाढविण्यात येणार आहे.
महापालिका प्रशासनाने सन 2018-19 या वर्षीच्या स्वच्छ सर्वेक्षणामध्ये हिरिरीने सहभाग घेतला होता. महापालिका आयुक्त, महापौरासह सर्व अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी आणि नगरसेवकांनी दोन महिने आपआपल्या भागामध्ये चांगले काम करण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु यामध्ये ग्राऊंडपातळीवर जाऊन काम न झाल्याने शहराचा स्वच्छतेचा दर्जा घसरल्याचे समोर आले. यामुळे खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने आतापासूनच म्हणजे वर्षभर ‘मिशन 2020’ हाती घेतले आहे. या मिशन अंतर्गतच ‘व्हीजन 0 ते 100’ देखील राबविण्यात येणार आहे.
नियमितपणे जनजागृती करण्यात येणार
शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी शहरामध्ये राहणार्या प्रत्येक नागरिकाची आहे. यामुळे आता यापुढे महापालिका प्रशासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणात जनजागृती अभियान हाती घेण्यात येणार आहे. हे अभियान केवळ सर्वेक्षण अभियानापुरते न ठेवता नियमितपणे जनजागृती करण्यात येणार आहे. याशिवाय कर्मचार्यांचे प्रशिक्षण, जास्तीत जास्त स्वयंसेवी संस्थाचा सहभाग वाढविण्यात येणार आहे. शहराच्या स्वच्छतेसाठी स्वतंत्र निधी खर्च न करता नागरिकांचा सहभाग, सीएसआर निधी आदी माध्यमांतून विविध कामे करण्यात येणार आहेत.
-ज्ञानेश्वर मोळक, घनकचरा विभागप्रमुख