स्वच्छ भारतप्रमाणे स्वच्छ इंटरनेट सेवा मिळायला हवी : हॅरल्ड डिकोस्टा

0

पुणे । भारतात करोडो माणसे इंटरनेटचा वापर करतात. फेसबुक, व्हॉट्स् अ‍ॅपसारख्या असंख्य अ‍ॅपवर आपण आपली वैयक्तिक माहिती टाकत असतो. परंतु ही माहिती कोणत्या सर्व्हरमध्ये जतन केली जात आहे, याबद्दल आपल्याला कोणत्याही प्रकारची माहिती नसते. अशा वैयक्तिक माहितीचा गैरवापर करून सायबर क्राईम घडताना दिसत आहे. त्यामुळे सायबर सुरक्षा महत्वाची असून ती काळाची गरज बनली आहे. स्वच्छ भारत प्रमाणे स्वच्छ इंटरनेट सेवा देखील आपल्याला मिळायला हवी, असे मत सायबर सिक्युरिटी तज्ज्ञ हॅरल्ड डिकॉस्टा यांनी व्यक्त केले.

ऑल इंडिया अ‍ॅन्टी करप्शन, क्राईम प्रिव्हेंटिव्ह अ‍ॅण्ड ह्युमन राईट्स कमिटी पुणे शहर व जिल्हातर्फे सायबर क्राईम आणि वाढती गुन्हेगारी याविषयावर व्याख्यानाचे आयोजन आपटे रस्त्यावरील आर्कफिट एरिना फिटनेस क्लबच्या सभागृहात करण्यात आले होते. यावेळी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष महेंद्र्र कडू, स्वप्निल खडके, सचिन फोलाने, नितीन गावडे, धीरज अरगडे, आशितोष धोडमिसे, निलेश डहाळे, अभिजित दळवी, सुधीर सोनार, दिलीप पेटकर, दीपाली सिन्नरकर, वैभव कोठूळे ,अभिजीत म्हसवडे, आयोजक मकरंद कलबुर्गी आदी उपस्थित होते. कार्यक्रमात हॅरल्ड डिकॉस्टा यांचा पुणेरी पगडी, शाल आणि रोप देऊन सन्मान करण्यात आला.

हॅरल्ड डिकॉस्टा म्हणाले, इंटरनेटवरून आपण आपल्या मोबाईलमध्ये विविध प्रकारचे अ‍ॅप डाऊनलोड करतो. परंतु डाऊनलोड करताना त्याच्या नियम व अटी न वाचताच ते अ‍ॅप आपण खरेदी करतो. फेसबुक, व्हॉट्स् अ‍ॅप चा सर्व्हर अमेरिकेत असून तुमची सगळी माहिती त्यांच्याकडे जतन होते. त्यामुळे आपल्या माहितीचा दुरुपयोग होऊ नये यासाठी प्रत्येकाने दक्षता घ्यायला हवी.

वैयक्तिक माहिती इंटरनेटवर टाकू नका
हॅरल्ड डिकॉस्टा म्हणाले, वैयक्तिक माहिती इंटरनेटवर टाकू नका. गोपनीय माहिती मेसेजच्या माध्यमातून पाठवू नका. मोबाईल, लॅपटॉप स्वत: खरेदी केलेलेच वापरा. मोबाईल, लॅपटॉप, क्रेडीट-डेबीट कार्ड स्वत:जवळ ठेवा. ग्रामीण भागातील लोकांनाही माहिती आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले.