स्वच्छ भारतसाठी आणखी किती जाहिरातबाजी

0

‘दरवाजा बंद करो, दरवाजा बंद’, असे शौचालय वापराचे आवाहन करणारी जाहिरात अनेक महिन्यांपासून दूरचित्रवाणी आणि आकाशवाणी या माध्यमातून प्रसारित केली जात आहे. वाहने चालवताना मोबाइलचा वापर करू नका, हेल्मेट वापरा, आयोडिनयुक्त मिठाचा वापर करा, अशी एक ना अनेक जाहिराती भारत सरकारच्या विविध खात्यांकडून जनहितार्थ प्रसारित केली जात आहेत. या जाहिरातींमागील उद्देश अर्थातच प्रबोधन आणि जनजागृती असा आहे, पण अशा प्रकारच्या आवाहनांवर सरकारला पैसे आणि मनुष्यबळ खर्च करावे लागणे हे भारतीय समाजकारणात आत्मपरिक्षणाचा विषय बनला आहे. याचाही विचार व्हायला हवा. एखाद्याला आर्थिक अडचणींमुळे शौचालय बांधण्यास अडचण येत असेल, तर गावातील श्रीमंत व्यक्तींनी दानशूरपणा दाखवून नडलेल्याला साहाय्य करावे. समस्यांचे निराकरण गावपातळीलाच व्हायला लागले, तर सरकारला सर्व गोष्टीत लक्ष घालावे लागणार नाही आणि अडचणीही गतीने सुटतील, पण त्यासाठी लोकांमध्ये आपलेपणाची, एकमेकांना साहाय्य करण्याची आणि एकत्वाची भावना निर्माण होणे आवश्यक आहे.

खरे तर रस्त्यावर कचरा टाकू नका, वाहतुकीचे नियम पाळा, शौचालयाचा वापर करा, असे सांगण्याची वेळच लोकांवर येऊ नये, पण आज प्रबोधनासाठी व्यापक स्तरावर प्रयत्न होत असूनही त्याची तितकीशी फलनिष्पत्ती नाही, ही वस्तुस्थिती आहे. स्वातंत्र्याच्या 70 वर्षांनंतरही स्वच्छ भारताचा नारा देत हागणदारीमुक्त भारतासाठी अभियान राबवावे लागत आहे.

जर लोकसहभागातूनच जागृती झाली असती आणि लोकांनीच पुढाकार घेऊन गावाची प्रगती करण्यासाठी प्रयत्न केले असते, तर आज देश प्रगतिपथावर पुष्कळ पुढे गेला असता. मी कशाला मध्ये पडू, ही वृत्ती नको! समाजात असेही चित्र दिसते की, एक व्यक्ती स्वत: नियमाने वागते, पण नियम तोडणार्‍या दुसर्‍या व्यक्तीकडे ती कानाडोळा करते. मी कशाला भानगडीत पडू, असा विचार करून अयोग्य कृतीकडे दुर्लक्ष करते आणि नियम तोडणार्‍या व्यक्तीवर तोंडसुख घेण्यातच धन्यता मानते. त्यामुळेही समाजात होणार्‍या बदलांचा वेग मंदावतो.

स्वतः शिस्त पाळण्याच्या जोडीला शिस्त मोडणार्‍यांनाही नम्रपणे एकदा जाणीव करून देणे आवश्यक आहे. समाजाचा गाडा व्यवस्थित चालवण्याची ठेकेदारी एकट्या सरकारची नसून समाज म्हणून व्यक्तींचेही काही दायित्व आहे. सामाजिक दायित्वाची भावना जोपर्यंत निर्माण होत नाही, तोपर्यंत सकारात्मक बदलांना वेग येणार नाही. लोकांनी त्यांच्या मनाचे दरवाजे उघडे करून व्यापकत्व आणले, तर शौचालयाचे दरवाजे बंद करा, अशी जाहिरातबाजी करण्याची सरकारवर वेळ येणार नाही.

– नित्रानंद भिसे
वृत्तसंपादक जनशक्ति, मुंबई
8424838659