स्वच्छ भारत अभियानात नागरिकांना सहभागी करा

0

धुळे । महाराष्ट्र शासनाने स्वच्छ भारत अभियान राबविण्याचा निर्णय घेतला असून त्याअंतर्गत धुळे महानगर स्वच्छतेसंबंधी कार्यरत झालेले आहेत. या अभियानात लोकप्रतिनिधींसह सर्वसामान्य नागरिकांचा सहभाग वाढावा त्यासाठी जागृती होवून प्रोत्साहन देण्यात यावे, अशी अपेक्षा आयुक्त सुधाकर देशमुख व महापौर कल्पना महाले यांनी व्यक्त केली. स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत आज धुळे महापालिकेच्या सभागृहात कार्यशाळा घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.

प्रभागनिहाय स्वच्छतेचे परिक्षण
महाराष्ट्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण-2018 अंतर्गत धुळे केवळ स्वच्छतेलाच शिव फाउंडेशनचे प्राधान्य असल्याची भूमिका फाउंडेशनचे पराग अग्रवाल यांनी मांडली. या कार्यशाळेला मनपा अधिकारी, पदाधिकार्‍यांसह सामाजिक संघटनांचे प्रतिनिधीही उपस्थित होते. आयुक्त सुधाकर देशमुख यांनी शहरात स्वच्छ सर्वेक्षण अभियान राबवितांना प्रभाग निहाय स्वच्छतेचे परिक्षण केले जाणार असल्याचे सांगितले. त्यानुसार प्रथम, व्दितीय व तृतीय बक्षिस दिले जाणार आहे.

प्रथम येणार्‍या वॉर्डास 30 लाखाचे बक्षिस
प्रत्येक वार्डात 1400 मार्कांची आखणी करण्यात आली असून त्यानुसार जास्तीत जास्त मार्क मिळविणार्‍या वार्डाला ही बक्षिसे दिली जाणार आहेत. ही रक्कम प्रथम 30 लाख,द्वितीय 20 लाख आणि तृतीय 15 लाख रूपये अशी आहे. यावेळी नगरसेवकांनी अभियान राबवितांना येणार्‍या अडचणी मांडल्या. या बैठकीला आयुक्त सुधाकर देशमुख, महापौर कल्पना महाले, उपमहापौर उमैर अन्सारी, सभापती वालीबेन मंडोरे, माधुरी अजळकर, नगरसेविका मायादेवी परदेशी, प्रतिभा चौधरी, जैबुन्निसा पठाण, नगरसेवक संजय गुजराथी, सुभाष जाधव, बंटी मासुळे, इस्माईल पठाण, नंदु सोनार, प्रशांत श्रीखंडे, उपायुक्त रविंद्र जाधव आदींसह आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.