स्वच्छ भारत अभियानात बचत गटांनी सहभाग घ्यावा

0

मुख्याधिकारी किशोर चव्हाण ; 45 महिला गटांची उपस्थिती

फैजपूर- भारत सरकारने स्वच्छ भारत अभियान सुरू केले असून यात आपला परीसर, आपले गाव आपले, घर स्वच्छ ठेवणे हे प्रत्येक नागरिकांची जबाबदारी आहे. स्वच्छतेबाबत पालिका जी मोहिम राबवेल त्यात बचत गटांनी सहभाग घेऊन पालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांनी केले. सोमवारी दुपारी गावातील दत्त मंदिर हॉलमध्ये गावातील सर्व बचत गटांची बैठक घेण्यात आली. मुख्याधिकारी चव्हाण म्हणाले की, आपल्या घरापासून ते आपल गाव स्वच्छ करणे ही आपली सर्वांची जबाबदारी नसून आपले कर्तव्य आहे. आपले घर स्वच्छ तर आपले शरीर निरोगी राहते. गावासाठी बचत गटांना स्वच्छ भारत अभियानात सहभाग घेतला तर नक्कीच आपले शहर स्वच्छ झाल्याशिवाय राहणार नाही फक्त मनाशी जिद्द आणि चिकाटी असली पाहिजे आणि ती जिद्द बचत गटांमध्ये असतेच हे मात्र खरे असल्याचे मुख्याधिकारी म्हणाले.

ओला कचरा व सुका कचरा वेगळा करा
‘ओला कचरा आणि सुका कचरा’ हा घरातील स्वयंपाक घरातून तयार होतो यासाठी महिलांनी हा कचरा वेगळा करण्यासाठी घरातच वेगवेगळ्या कचराकुंडी ठेवणे गरजेचे आहे. पालिकेच्या कचरा गाडीत कचरा टाकतांना सुद्धा ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा टाकावा. यासाठी पालिकेकडून ज्या उपाययोजना करता येतील त्या नक्कीच केल्या जातील, असे मुख्याधिकारी चव्हाण म्हणाले.

कापडी पिशवी बनवणे हा महिलांसाठी उद्योग
महाराष्ट्र राज्य सरकारने प्लास्टिक बंदीचा अतिशय महत्वाचा निर्णय घेतला आहे. महिला बचत गटांनी प्लास्टिक बंदीला पर्याय म्हणून कापडी, कागदी, साडी या आदी साहित्यापासून पिशवी तयार करू शकता भविष्यात महिला बचत गटांना या माध्यमातून उद्योग मिळेल आणि पर्यावरणाला याचा दुष्पपरीणाम होणार नाही. यावेळी मुख्याधिकारी किशोर चव्हाण, स्वच्छता व पाणीपुरवठा अधिकारी विपुल साळुंखे, शहर समन्वयक विकी बागुल, सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रवीण सपकाळे, सुधीर चौधरी, महिला बचत गट समन्वयक विद्या सरोदे यासह बचत गटातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचलन विकी बागुल तर आभार प्रवीण सपकाळे यांनी मानले.