स्वच्छ भारत अभियान गिरीभ्रमणासह स्वच्छतेचा जागर

0

विदयार्थ्यांचा उपक्रम, हरिश्‍चंद्रगड प्लॅस्टिकमुक्त

पिंपरी : विदयार्थ्यांनी आयुष्यात आपल्या देशाचा इतिहास जपला पाहिजे. आपणच आपल्या इतिहासाची जपणूक केली तरच इथुन पुढची पिढीदेखील इतिहास जपेल. आपल्या संस्कृती आणि परंपरा यांचेही असेच पालन करणे गरजेचे आहे. गिरीभ्रमण करताना पर्यटक अनेकदा आपला कचरा तसाच टाकून जातात. या डोंगर दर्‍यांमधून आपला इतिहास दिसतो. मात्र डोंगर, किल्ले असे खराब करणे चुकीचे आहे. आपणच आपला इतिहास बिघडवतो आहोत, असे मत राष्ट्रीय सेवा योजनेच्या विभागीय सम्नवयक प्रा. मिनल भोसले यांनी व्यक्त केले.

सावित्रीबाई फुले पुणे विदयापीठ राष्ट्रीय सेवा योजना व डॉ. डी. वाय. पाटील विदया प्रतिष्ठान सोसायटीचे डॉ. डी. वाय. पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविदयालय यांच्या संयुक्त विदयमाने रतनगड, कळसुबाई, हरिश्‍चंद्रगड अभयारण्य या ठिकाणी विदयापीठस्तरीय स्वच्छ भारत अभियानातून निसर्ग सर्वंधन शिबिर पार पडले. त्यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रा. भोसले बोलत होत्या.

महाशिवरात्रीनंतर कचरा जास्त
रतनवाडी या ठिकाणी सातवाहनकालीन अमृतेश्‍वराचे मंदीर आहे. या परिसरात महाशिवरात्रीला खुप मोठी यात्रा भरते. या यात्रेच्या निमित्ताने आसपासच्या परिसरातून आठ ते दहा हजार भाविक या ठिकाणी जमा होतात. यात्रेत अनेक स्टॉल या ठिकाणी लागतात. आलेले

भाविक नारळाच्या शेंडया, पाने-फुले, प्लॅस्टिकच्या पिशव्या डोंरावर फेकुन देतात. या दरम्यान या भागात मोठया प्रमाणावर कचरा होतो. या ठिकाणावरील कचरा साफ करण्यासाठी गेली दोन वर्षे महाशिवरात्रीनंतर महाविदयालयामार्फत राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबिर घेण्यात येते. या निमित्ताने स्वच्छ भारत अभियानात खारीचा वाटा उचलता येईल हा उद्देश डोळयांसमोर ठेवून या शिबिराचे आयोजन करण्यात येत असते.

रतनगडावर 20 पोती कचरा
यावर्षी देखील विदयार्थ्यांनी येथील परिसराची स्वच्छता केली. मंदीराच्या बाजुला असलेला कुंड, आसपासच्या शेतात पडलेले प्लॅस्टिक तसेच संपूर्ण रतनवाडीची स्वच्छता विद्यार्थ्यांनी केली. याचबरोबर रतनगडावर अनेक पर्यटक जातात. जाताना कचरा, प्लॅस्टिक गडावर टाकून जातात. विद्यार्थ्यांनी गिरिभ्रमण करताना गडावरील जवळजवळ 20 पोती कचरा उचलला. या शिबिराच्या विदयापीठाच्या नगर, नाशिक, पुणे अशा तीनही विभागातून 200 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या शिबिरात विद्यार्थ्यांना स्वच्छतेबरोबर कळसुबाई हरिश्‍चंद्र अभयारण्यातील देवराई त्या भागातील औषधी वनस्पतींविषयी महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. मोहन वामन यांनी माहिती दिली.

पथनाट्याद्वारे केली जनजागृती
या शिबिरात संस्थेचे अध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील तसेच विश्‍वस्त डॉ. स्मिता जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले. या शिबीराच्या समारोप प्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विदयापीठाचे राष्ट्रीय सेवा योजेनेचे सम्नवयक डॉ. प्रभाकर देसाई उपस्थित होते. या शिबिरात नदीप्रदुषण, स्त्रीभ्रूण हत्या, बालकामगार या विषयांवर पथनाटयाद्वारे विदयार्थ्यांनी जनजागृती केली. या शिबिराचे आयोजन महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. मोहन वामन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. या आयोजनात राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. गणेष फुंदे, प्रा. खालीद शेख, नंदकुमार खंडागळे, अमित साळुंखे यांनी महत्वाचा सहभाग नोंदवला.