स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ‘स्वच्छथॉन’ राष्ट्रीय अभियानाचा शुक्रवारी शुभारंभ

0

मुंबई | पेयजल व स्वच्छता मंत्रालय भारत सरकार आणि पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्वच्छथॉन’ १.० या राष्ट्रव्यापी कार्यक्रमाचा शुभारंभ उद्या, शुक्रवार, ११ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता सह्याद्री अतिथीगृह येथे होणार आहे.

या कार्यक्रमास पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, राज्यमंत्री सदाभाऊ खोत, विभागाचे अपर मुख्य सचिव शामलाल गोयल, राज्य सॅनिटेशन प्रमुख रुचेस जयवंशी, युनिसेफच्या क्षेत्रिय कार्यालयाचे प्रमुख श्रीमती राजेश्वरी चंद्रशेखर, ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनचे अध्यक्ष सुधींद्र कुलकर्णी, स्वच्छ भारत मिशन ग्रामीण सहसचिव व्ही. राधा आदी उपस्थित राहणार आहेत.

स्वच्छ भारत मिशन ग्रामीण या कार्यक्रमास तीन वर्ष पूर्ण होत आहेत. त्या निमिताने स्वच्छथॉन’ १.० या अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम राबविताना गेल्या तीन वर्षात आलेल्या अडचणींवर सामाजिक सहभाग वाढवून नाविन्यपूर्ण उपाय शोधणे हा या स्वच्छथॉन’ १.० अभियानाचा मुख्य उद्देश आहे. स्वच्छथॉन’ १.० या अभियानांतर्गत शौचालयाचा वापर करणे, सामाजिक वर्तणुकीतील बदल, अवघड क्षेत्रातील शौचालय तंत्रज्ञान, शाळेतील शौचालय वापर, दुरुस्ती व देखभाल यावर मार्ग काढणे, मानवी वापरलेल्या वस्तूंची तांत्रिक पद्धतीने विल्हेवाट लावणे आणि सुरक्षित वापर करणे, जलद गतीने या वस्तूंची विल्हेवाट लावणे याबाबत राष्ट्रीय पातळीवर मार्ग शोधणे या अनुषंगाने शुभारंभ कार्यक्रमास तज्ज्ञ व्यक्ती व वरिष्ठ शासकीय अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत.

‘स्वच्छथॉन’ अभियान देश पातळीवर तीन टप्प्यात राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत पहिल्या टप्प्यात व्यक्ती व संस्था यांच्याकडून नवनवीन कल्पनांबाबत ऑनलाईन अर्ज २५ ऑगस्ट २०१७ पर्यंत मागविण्यात येणार आहेत (स्क्रीनिंग राऊंड). दुसऱ्या टप्प्यात आलेल्या अर्जातून १० वर्गवारीत ६० व्यक्ती व संस्था सहभाग घेतलेल्यांची यादी तयार करण्यात येणार आहेत. अंतिम टप्प्यात ८ व ९ सप्टेंबर २०१७ रोजी नवी दिल्ली येथे विजेते घोषित करण्यात येणार आहे

महात्मा गांधी सेंटर फॉर सॅनिटेशन क्लिनलीनेस आणि कम्युनिटी हेल्थ हे या अभियानाचे नॉलेज सहकारी आहेत.