नगरसेविका करुणा चिंचवडे यांचे नागरिकांना आवाहन
रावेत : संतांची भूमी म्हणवणार्या आपल्या महाराष्ट्राने संत गाडगेबाबांच्या स्वच्छतेविषयक उपदेशांना पुस्तकांमध्ये किंवा कथा-कीर्तनांमध्ये गुंतवून ठेवले. प्रत्यक्ष आचरणात मात्र, आपण सुधारणेला भरपूर वाव ठेवला आहे. म्हणूनच केंद्र सरकारने ‘स्वच्छ भारत’ ही योजना सुरू करून ‘एक पाऊल स्वच्छतेकडे’ टाकण्यास सर्व भारतीयांना प्रवृत्त केले आहे. स्वच्छ भारत योजनेत सर्वांनी सहभाग नोंदविला पाहिजे, असे आवाहन नगरसेविका करुणा चिंचवडे यांनी केले. प्रभाग क्रमांक 17 मधील नागसेननगर झोपडपट्टीतील ज्या नागरिकांनी महापालिकेच्या योजनेंतर्गत शौचालय बांधले आहे; अशा कुटुंबीयांचा सत्कार समारंभ नुकताच बिजलीनगरात पार पडला. यावेळी त्या बोलत होत्या.
यांची होती उपस्थिती
या कार्यक्रमाला नगरसेवक नामदेव ढाके, शेखर चिंचवडे, क्षेत्रिय अधिकारी संदीप खोत, आरोग्य अधिकारी राजेंद्र उज्जेनवाल, के. डी. दरवडे, वसंत सरोदे, बिभीषण चौधरी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
अनेकांनी बांधली शौचालये
शेखर चिंचवडे युथ फाउंडेशन आणि महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या प्रभाग स्वच्छता अभियानात सहभागी असणार्या आरोग्य कर्मचार्यांचादेखील या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. नागसेननगर झोपडपट्टीतील नागरिक शौचालयाअभावी उघड्यावर शौचास जात असत. त्यांना शेखर चिंचवडे फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी शौचालयाचे व स्वच्छतेचे महत्व पटवून दिले. त्यांना महापालिकेच्या योजनेंतर्गत नगरसेविका करुणा चिंचवडे यांच्या मदतीने शौचालय बांधण्यासाठी अनुदान प्राप्त करून देण्यात आले. त्यामुळे येथील अनेक नागरिकांनी वैयक्तिक शौचालये बांधली आहेत.