स्वच्छ भारत संदर्भातील ‘टॉयलेट एक प्रेमकथा’ चित्रपटाचा विशेष शो

0

जैताणेे (रविंद्र जाधव) । खुडाणे येथील ग्रामपंचायतीतर्फे नुकताच स्वछ भारत संदर्भित टॉयलेट एक प्रेमकथा हा अभिनेता अक्षय कुमारची भुमिका असलेला चित्रपट ग्रामस्थांना दाखविण्याचे आला. स्वछतेविषयी आपण प्रत्येकाने जागरूक असावे व स्वच्छ भारत सुंदर भारत ही संकल्पना प्रत्येक भारतीयाने मनात रुजविल्यावरच हा देश स्वच्छ होईल या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद दिला आहे. साक्री तालुक्यातील खुडाणे ग्रामपंचायतीने अनोखा उपक्रम राबविला आहे. जनजागृतीसाठी नेहमीच भित्तीचित्र, पत्रके आदींचा वापर करण्यात येत असतो. परंतु, खुडाणे येथे गावकर्‍यांना चित्रपट दाखवून जनजागृती करण्यात आली.

सरपंचांनी घेतला पुढाकार
शौचालय वापराबाबत नागरिकांमध्ये जनजागृतीबाबत निर्माण करण्यासाठी सरपंचांनी पुढाकार घेतला आहे. शौचालय वापरावर आधारित ‘टॉयलेट एक प्रेमकथा‘ चित्रपट गावांतच सर्वांना दाखविण्याचा निश्‍चय करण्यात आला. यानुसार गावामध्ये चित्रपटाचे ‘विशेष शो‘चे आयोजन करण्यात आले होते. याचित्रपटातून शौचालय वापराचे महत्त्व उत्तम प्रकारे मांडण्यात आले असून हा चित्रपट पाहून नागरिकांनी शौचालय बांधण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला.

शौचालय वापराचा निर्धार
शौचालय वापरासंदर्भात खेडे गावातील जनता अनभिज्ञ असते. लोकांच्या मनात आगोदर स्वच्छतेविषयी जागृती निर्माण करूनच या समस्येवर मात करता येईल हे सरपंच कल्पना गवळे,उपसरपंच नामदेव गवळे, ग्रामसेवक मोहिते, पराग माळी, महेश बाविस्कर आदींनी जाणून होते. म्हणून त्यांनी ‘टॉयलेट एक प्रेमकथा‘ या चित्रपटाचे आयोजन केले. सरपंच स्वतः घरोघरी जाऊन चित्रपट पाहण्यासाठी बोलावतांना दिसले. चित्रपटाचे आयोजन गावातील संत सावता मंदिरात करण्यात आले होते. त्यासाठी सर्व्यांनी मेहनत घेतली.

घर तेथे शौचालय
खुडाणे येथील सरपंच कल्पना गवळे यांच्या संकल्पनेतून ‘घर तेथे शौचालय‘ ह्या उपक्रमावर भर दिला जातो आहे. सन 2014-15 पर्यंत खुडाणे गावात 700 कुटुंबापैकी फक्त 70 कुटुंबाकडे शौचालय होते. मात्र आज ही संख्या 380 पर्यंत पोहोचली आहे. कारण म्हणजे गावकर्‍यांमध्ये स्वच्छतेविषयी निर्माण केलेली जागरूकता मोहिम होय. सर्व जाती समाज गुण्या गोविंदाने राहत असलेल्या या गावात अस्वच्छतेमुळे चौफेर घाणीचे साम्राज्य निर्माण झाले होते.