‘स्वच्छ लोणावळा’ मॅरेथॉन स्पर्धेला प्रतिसाद

0

लोणावळा : लोणावळा शहरात पर्यटनासाठी येणार्‍या पर्यटकांना तसेच लोणावळेकर नागरिकांना स्वच्छतेचे महत्व देण्यासाठी लोणावळा शहरात स्वच्छ लोणावळा मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत हजारो स्थानिक नागरिकांसह पर्यटक तसेच काही सिने कलाकारांनीही सहभाग घेतला होता. पर्यटन नगरी म्हणून प्रसिद्ध असणारे लोणावळा शहर स्वच्छतेबाबतही पर्यटकांच्या पसंतीस उतरावे यासाठी स्वच्छ सर्वेक्षण अभियानाच्या माध्यमातून लोणावळा शहर स्वच्छ सुंदर व कचरामुक्त तसेच निर्मल करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरु आहेत. वेगवेगळ्या पातळीवर शहरात स्वच्छेबाबतची कामे व प्रबोधन मोहीम सुरु आहे. याच मोहिमेचा एक भाग म्हणून रविवारी (10 डिसेंबर) रोजी स्वच्छ लोणावळा मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

सर्वथरातून सहभाग
मावळचे आमदार बाळा भेगडे यांच्या हस्ते ध्वज दाखवून या मॅरेथॉनची सुरुवात करण्यात आली. यावेळी लोणावळ्याच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, मुख्याधिकारी सचिन पवार, पंचायत समिती सभापती गुलाबराव म्हाळस्कर, नगरसेवक राजू बच्चे, सिने अभिनेत्री झहीरा वहाब यांच्यासह आजी माजी नगरसेवक, विविध पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. या मॅरेथॉन स्पर्धेत सुमारे पाच हजार स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यात प्रामुख्याने हौशी धावपटूसह, विविध सामाजिक संस्था आणि लोणावळा शहर परिसरातील शाळा, महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांचा समावेश होता.

सहभागींना प्रशस्तीपत्र
सर्व सहभागी स्पर्धकांना सहभागाबद्दल मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र आणि मेडल देण्यात आले. नागरिकांसह लोणावळ्यात येणार्‍या पर्यटकांना स्वच्छतेचे महत्व पटावे यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी यावेळी दिली.