‘स्वच्छ व सुंदर शहरासाठी उपाययोजना’वर प्रदर्शन!

0

नवी मुंबई । महानगरपालिका शिक्षण विभागाच्या वतीने जागतिक विज्ञान दिनाचे औचित्य साधून नमुंमपा शाळा क्र.11/92, कुकशेत येथे विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. स्वच्छ भारत मिशनमध्ये नवी मुंबई महानगरपालिका ‘स्वच्छ सर्वेक्षण-2018’ मध्ये सहभागी होत असल्याने स्वच्छ व सुंदर शहरासाठी उपाययोजना या मुख्य विषयाशी संबंधित इ. 1 ली ते 5 वीसाठी घरातील कचर्‍याचे व्यवस्थापन, सौर ऊर्जा, टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू तयार करणे या विषयांवर आधारित विज्ञान प्रयोग प्रकल्प, इ. 6 वी ते 8 वीसाठी ई-कचरा व्यवस्थापन व पुनर्वापर, पानथळ जमिनीचे संवर्धन,शाश्‍वत पर्यावरणासाठी पुनर्वापर व संकल्पना, शालेय कचरा व्यवस्थापन या विषयांवर आधारित विज्ञान प्रयोग प्रकल्प विज्ञान प्रदर्शनासाठी निश्‍चित करण्यात आले होते.

या विज्ञान प्रदर्शनासाठी प्राथमिक गटासाठी 66 व उच्च प्राथमिक गटासाठी 66 अशा एकूण 132 प्रवेशिका प्राप्त झाल्या होत्या. विज्ञान प्रदर्शन व शैक्षणिक साहित्य निर्मिती प्रदर्शनाचे उद्घाटन नवी मुंबईच्या उपमहापौर मंदाकिनी म्हात्रे यांच्या शुभहस्ते, समाजकल्याण व झोपडपटृटी सुधार समिती सभापती अनिता मानवतकर, नगरसेविका सुजाता पाटील, शिक्षणाधिकारी संदीप संगवे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. याप्रसंगी उपमहापौर मंदाकिनी म्हात्रे यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करुन नवी मुंबई क्षेत्रात विज्ञान केंद्र तयार करण्यात यावे असे सांगितले. विज्ञान प्रदर्शनाचा समारोप व बक्षिस वितरण समारंभ प्रसंगी इ.1 ली ते 5 वीच्या प्राथमिक गटात ज्ञानदीप विद्यालय ऐरोली तसेच 6 वी ते 8 वी च्या गटात तुर्भेतील अंजुमन ईस्लाम मुस्तफा फ्कीह हायस्कूल विजेतेपदाचे मानकरी ठरले. शिक्षकांसाठीच्या शैक्षणिक साहित्य निर्मिती स्पर्धेत नमुंमपा शाळा क्र. 18 सानपाडा येथील शइक्षिका श्रीम. मिथीला अविनाश भोसले प्रथम क्रमांकाच्या मानकरी ठरल्या. प्राथमिक गटासाठी 5 पारितोषिके, उच्च प्राथमिक गटासाठी 5 पारितोषिके व शैक्षणिक साहित्य निर्मिती स्पर्धेत 5 शिक्षकांना उपमहापौर मंदाकिनी म्हात्रे यांच्या शुभहस्ते पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले.