स्वच्छ सर्वेक्षणाचा ‘फास्टर मुव्हर क्लीननेस सिटी’चा भुसावळ पालिकेला ‘अ‍ॅवार्ड’

0

देशात इंदौर शहर दुसर्‍यांदा आले प्रथम तर भोपाळ शहराने पटकावला दुसरा तर चंदीगढचा तृतीय क्रमांक

भुसावळ- देशातील दुसर्‍या क्रमांकाचे अस्वच्छ शहर म्हणून भुसावळचे गतवर्षी नाव आल्याने शहरवासीयांची मान शरमेने खाली गेली होती मात्र 2018 च्या सर्वेक्षणात एक ते तीन लाख लोकसंख्येच्या शहरांच्या यादीत भुसावळ पालिकेने ‘फास्टर मुव्हर क्लीननेस सिटी‘ (जलदगतीने स्वच्छतेच्या उपाययोजना करणारे लहान शहर) चा अ‍ॅवॉर्ड पटकावला असल्याची माहिती पालिकेचे मुख्याधिकारी बी.टी.बाविस्कर यांनी ‘दैनिक जनशक्ती’शी बोलताना दिली. दिल्ली येथे बुधवारी सायंकाळी केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी याबाबत घोषणा केली. गतवर्षाप्रमाणेच स्वच्छ सर्वेक्षणात इंदौर शहर प्रथम आले असून दुसरा क्रमांक भोपाळ शहराने तर तिसरा क्रमांक चंदीगढ शहराने पटकावला आहे. स्वच्छ सर्वेक्षणाबाबत अन्य शहरांच्या नावांचा क्रमांक रात्री उशिरापर्यंत कळू शकला नाही.

भुसावळ शहराला देशातून पहिले बक्षीस
देशभरातील तब्बल चार हजार 200 हून अधिक शहरांमध्ये स्वच्छ सर्वेक्षण 2018 अंतर्गत सर्वेक्षण करण्यात आले होते तर यंदा या सर्वेक्षणात 52 वेगवेगळ्या प्रकारच्या निकषांवर आधारीत विविध अ‍ॅवॉर्ड जाहीर करण्यात आले होते. त्यात भुसावळ पालिकेला ‘फास्टर मुव्हर क्लीननेस सिटी‘ चा अ‍ॅवॉर्डही जाहीर झाला आहे. एक ते तीन लाख लोकसंख्येच्या शहरातून एकमेव भुसावळ पालिकेला हा अ‍ॅवॉर्ड मिळाला आहे. स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत चार गुणांची परीक्षा होती. त्यात शहरातील स्वच्छता, घर-घर कचरा संकलन, नागरीकांच्या तक्रारी सोडवण्यासाठी अ‍ॅप्स, अपडेट कागदपत्रांची हैद्राबादच्या कार्वी एजन्सीने तपासणी केली होती.

इंदौर शहर दुसर्‍यांदा आले प्रथम
स्वच्छ सर्वेक्षणात इंदौर शहराने गतवर्षी देखील प्रथम क्रमांक पटकावला होता तर 2018 च्या सर्वेक्षणातही इंदौर शहर प्रथम आले असून दुसरा क्रमांक भोपाळ व तिसरा क्रमांक चंदीगढ शहराने पटकावला आहे. दरम्यान, स्वच्छ शहरांच्या रॅकींगची यादी रात्री उशिरापर्यंत कळू शकली नाही त्यामुळे भुसावळ शहराचा यंदा नेमका स्वच्छ सर्वेक्षणात कितवा क्रमांक आला ? याबाबत माहिती कळू शकली नाही.

कामात सुधारणा केल्याने यश -मुख्याधिकारी
भुसावळ पालिकेला जाहीर झालेला पुरस्कार म्हणजे आम्ही कामांमध्ये केलेल्या सुधारणांचे फलित आहे, अशी भावना मुख्याधिकारी बी.टी.बाविस्कर यांनी व्यक्त केली. ते म्हणाले की, स्वच्छ सर्वेक्षणात आधी शहराचे नाव खराब झाल्यानंतर आम्ही अनेक सुधारणा केल्या. शहरात जागो-जागी डस्ट बीन ठेवण्यात आल्या तर नागरीकांसाठी अ‍ॅप सुविधा सुरू करून त्याद्वारे तक्रारींचे निरसन करण्यात आले.

भुसावळातील सर्वेक्षण मॅनेज -विरोधकांचा आरोप
भुसावळ पालिकेला मिळालेला अ‍ॅवॉर्ड म्हणजे एक प्रकारे सर्वेक्षण मॅनेज करण्यात आले असून हैद्राबादच्या कार्वी एजन्सीच्या चौकशीची आम्ही मागणी करू, असे जनआधारचे गटनेता उल्हास पगारे म्हणाले. 5 मे रोजी शहर अस्वच्छतेला एक वर्ष पूर्ण झाल्याने शहरातील अस्वच्छतेचे छायाचित्र पालिकेच्या प्रवेशद्वारावर आम्ही लावून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. संपूर्ण शहराला अस्वच्छतेचा वेढा असताना मिळालेला पुरस्कार म्हणजे ही बाब हास्यास्पद असल्याचेही पगारे म्हणाले.