इंदोर शहराचा अधिकार्यांनी केला दौरा
पुणे : स्वच्छ सर्वेक्षणात घसरलेले मानांकन सुधारण्यासाठी महापालिका प्रशासन पुन्हा कामाला लागले आहे. सलग तीन वर्षे देशात स्वच्छतेत पहिला क्रमांक मिळविणार्या इंदोर शहराच्या स्वच्छतेच्या कामकाजाची माहिती घेण्यासाठी पुणे महापालिकेच्या 10 अधिकार्यांनी नुकताच 2 दिवसांचा इंदोर दौरा केला.
केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत नुकत्याच जाहीर झालेल्या स्वच्छ सर्वेक्षण 2019 स्पर्धेत देशातील स्वच्छ शहरात महापालिकेचा क्रमांक 10 वरून थेट 37 वर गेला आहे. या सर्वेक्षणासाठी 2 सल्लागार नेमूनही मानांकन घसरल्याने पालिका प्रशासनाने या सर्वेक्षणासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करून आणि चांगले काम करूनही टीकेचा सामना करावा लागला होता. स्वच्छ सर्वेक्षणात पालिकेची नेमकी काय चूक झाली आणि इंदोर शहराकडून या सर्वेक्षणासाठी कशा प्रकारे वर्षभराचे नियोजन केले जाते. याची माहिती घेण्यासाठी महापालिकेच्या प्रमुख 10 अधिकार्यांचे पथक दोन दिवसांच्या इंदोर दौर्यावर गेले होते.
सर्वेक्षणात मोठ्या प्रमाणात बदल
महापालिकेच्या अधिकार्यांच्या दौर्यानंतर पुढील वर्षभर पालिकेत कशा प्रकाचे स्वच्छ सर्वेक्षणासाठी उपाययोजना करता येतील याचे नियोजन केले जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. केंद्राकडून यावर्षीपासून सर्वेक्षणात मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले आहेत. यापूर्वी वर्षाच्या अखेरीस डिसेंबर व जानेवारीत हे सर्वेक्षण होत असे मात्र, आता प्रत्येक महिन्याला केंद्राने स्वच्छ सर्वेक्षणाचे निकष ठरवून दिले असून त्याची पूर्तता करणे बंधनकारक असणार आहे. तसेच, या महिन्यांच्या निकष पूर्तीवरच वर्षाच्या अखेरीस एकत्रित गुणांकन केले जाणार असून त्यावर शहराचे स्वच्छतेचे मानांकन ठरणार आहे. त्यामुळे पालिकेने पहिल्या महिन्यापासूनच या सर्वेक्षणासाठी कंबर कसली आहे.