स्वच्छ सर्व्हेक्षणासाठी नगरपरिषदेचा संकल्प 

0
आळंदीमध्ये 14 हजार डस्ट बिनचे वाटप 
आळंदी : स्वच्छ सर्व्हेक्षण 2019 साठी यावर्षी आळंदी नगरपरिषदेने जनजागृतीतुन प्रभावी उपाययोजना करीत स्पर्धेत पहिल्या 10 नगरपरिषदांमध्ये आळंदीचा क्रमांक येण्यासाठी संकल्प केल्याचे नगरपरिषद नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, मुख्याधिकारी समीर भूमकर यांनी सांगितले. तीर्थक्षेत्र आळंदीत नगरपरिषदेच्या हद्दीत केंद्र सरकारच्या स्वच्छता अभियानास 4 जानेवारी पासून यावर्षी स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या विशेष स्वच्छता सर्वेक्षण 2019 अभियानासाठी आळंदीत नगरपरिषदेने विविध उपक्रम राबवित कामाला गती दिली आहे. विशेष स्वच्छता अभियान मध्ये यावर्षीही आळंदी नगरपरिषद स्पर्धेत भाग घेत आहे. या स्पर्धेच्या अनुषंगाने शहरात कामकाज सुरु केल्याचे मुख्याधिकारी समीर भूमकर यांनी सांगितले.
कचरा वर्गीकरणास गती 
नगरपरिषदेने शहरात ओला व सुका कचरा थेट निर्मितीच्या जागेवर वर्गीकरण करून स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. यासाठी नागरिकांना सामाजिक उत्तर दायित्वातून प्रभागांमध्ये हजारो कचरा कुंडीचे मोफत वाटप केले आहे. यामुळे जनजागृती होत कचरा वर्गीकरणास गती मिळाली आहे. आळंदी नगरपरिषद पदाधिकारी, 1 ते 9 प्रभागातील नागरिक, स्वयंसेवी संस्था, शाळा, सामाजिक कार्यकर्ते, सोशल मीडियाचा सकारात्मक वापर करून स्वच्छतेसाठी तरुणांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. स्वच्छ आळंदी, सुंदर आळंदी या अभियानातून तीर्थक्षेत्र आळंदीला यावर्षी पहिल्या 10 नगरपरिषदांत परिणाम कारक काम करून आणण्यास प्रशासन व पदाधिकारी यांनी संकल्प केला असल्याचे नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांनी सांगितले.
या वर्षीच्या स्पर्धेसाठी सेवास्तर, कचरा संकलन व वाहतूक, कचरा प्रक्रिया व विल्हेवाट, माहिती शिक्षण व जनजागृतीतून संवाद आदी कामकाज केले जात आहे. या अंतर्गत शहरामध्ये संदेश देणार्‍या भिंती रंगविल्या जात असल्याचे मुख्याधिकारी समीर भूमकर यांनी सांगितले. स्वच्छ सर्वेक्षण अभियानाच्या पार्श्‍वभूमीवर आळंदीत लक्षवेधी कामकाजाचे जाहिरात फलक लावण्यात आले आहेत.