स्वच्छ, सुंदर जेजुरीसाठी सहकार्य करा : संजय केदार

0

जेजुरी । स्वच्छ भारत योजनेंतर्गत सर्वेक्षण स्पर्धेत जेजुरी नगरपालिका सर्वोत्तम ठरावी यासाठी जेजुरी पालिका प्रशासन व लोकप्रतिनिधी विविध उपक्रम राबवीत आहे. स्वच्छ व सुंदर जेजुरी या अभियानासाठी जेजुरीकर नागरिकांनी पालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन जेजुरी पालिकेचे मुख्याधिकारी संजय केदार यांनी केले. शहर व परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी जेजुरी पालिकेच्या वतीने दक्षता घेतली जात आहे. दररोज घंटागाडीच्या माध्यमातून ओला व सुका कचरा वेगळा करण्यात येत आहे. कचरा, मृतप्राणी गटर्स आरोग्य विषयक तक्रारी देण्यासाठी अ‍ॅप तयार करून नागरिकांना त्यावर माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तक्रार आल्यास आठ तासांच्या आत या तक्रारीचे निवारण केले जाणार आहे. जेजुरी शहर हागणदारीमुक्त झाले असून कोणीही उघड्यावर शौचास बसू नये, वैयक्तिक शौचालय नसल्यास सार्वजनिक शौचालयाचा वापर करावा, असे आवाहन पालिकेचे अधिकारी राजेंद्र गाढवे, बाळासाहेब खोमणे, कन्हैया लाखे, वंदन चिव्हे, सोमनाथ नारळकर आदींनी केले आहे.

पथनाट्यातून जनजागृती
शहरातील सर्व हॉटेल, शाळा, रुग्णालये, गृहनिर्माण संस्था, मोहल्ला व्यापारी व नागरिकांना पत्रके काढून स्वच्छ व सुंदर जेजुरी अभियानासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच जेजुरी शहरातील सर्व विद्यालयांनी या मोहिमेत भाग घेतला. विद्यार्थ्यांनी शहरातील चौकाचौकात पथनाट्ये सादर करून स्वच्छतेविषयी जनजागृती केल्याचे मुख्याधिकारी संजय केदार यांनी सांगितले.