स्वतंत्र आयुक्तालयाचे स्वप्न अंधातरी

0

पिंपरी :- स्वतंत्र पोलीस आयुक्तालयासाठी जागा उपलब्ध झालेली नसल्यामुळे अद्यापतरी स्वतंत्र आयुक्तालयाचे स्वप्न थंड बस्त्यात आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवडकरांचे आयुक्तालयाचे स्वप्न अंधातरी आहे. दोन आठवडे उलटून गेल्यानंतरही अद्याप स्वतंत्र आयुक्‍तालयाच्या उद्‌घाटनाला मुहूर्त मिळालेले नाही. त्यामुळे सध्या तरी स्वतंत्र पोलीस आयुक्‍तालय सुरु होईल, तशी काही चिन्हे दिसत नाही आहे. १ मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर तरी आयुक्‍तालय सुरु होण्याचा अंदाज गुलदस्त्यातच राहण्याची शक्‍यता आहे.

स्वतंत्र पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्‍तालयाला मंत्री मंडळाच्या बैठकीत मान्यता मिळाल्यानंतर शहरात या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. आयुक्‍तालय उभारण्यासाठी शहरातील विविध भागांमध्ये जागा शोधण्याचे काम सुरु होते. याकरिता आतापर्यंत संत तुकारामनगर येथील डॉ. डी. वाय. पाटील तंत्र शिक्षण संस्थेजवळील मोकळी जागा, प्रेमलोक पार्कमधील महापालिका शाळा आणि फ क्षेत्रीय कार्यालय या जागांची पाहणी करण्यात आली होती. सध्या तरी या जागेवरील ताबा मिळाले नसल्याने, आयुक्‍तालयाचे घोडे अडले आहे. आयुक्‍तालयासाठी तात्पुरती जागा भाड्याने घेतली जाण्याची शक्‍यता होती. पोलीस प्रशासनाने प्रेमलोक पार्कमधील महापालिका शाळा इमारत आणि महापालिकेचे निगडीतील फ क्षेत्रीय कार्यालय या दोन इमारतींची महापालिका प्रशासनाकडे मागणी केली आहे. यावर अद्याप निर्णय झालेला नाही.