कोल्हापूर (प्रतिनिधी) – लिंगायत धर्माला स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता मिळावी या मागणीसाठी लिंगायत समाजाने रविवारी कोल्हापुरात प्रचंड मोठा मोर्चा काढला. या मोर्चात लिंगायत समाजातील लाखो लोक सहभागी झाले होते. कोल्हापूरच्या दसरा चौकात सकाळी 10 वाजल्यापासून संपूर्ण राज्यभरातून आणि सीमाभागातून लिंगायत समाजातील हजारो लोक मोर्चात सहभागी झाले. या मोर्चात तरुणांचा भरणा अधिक होता. या मोर्चाचे दसरा चौकातच सभेत रुपांतर झाले.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना निवेदन सादर
या सभेत विविध पक्षाचे नेते उपस्थित होते. यावेळी 77 संघटनांनी स्वतंत्र लिंगायत धर्माच्या मागणीला पाठिंबा दिला. माजी महापौर स्वाती यवलुजे यांनीही सर्व नगरसेवकांच्या सोबत मोर्चात सहभागी होऊन स्वतंत्र लिंगायत धर्माची मागणी लावून धरली. सभेनंतर लिंगायत समाजाच्यावतीने पालकमंत्री आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
अल्पसंख्यांक दर्जा देण्याची मागणी
लिंगायत धर्माला स्वतंत्र धर्म म्हणून घोषित करणे आणि अल्पसंख्याक म्हणून मान्यता देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. स्वत: चंद्रकांत पाटील यांच्यासह खासदार धनंजय महाडिक, आमदार हसन मुश्रीफ, संध्यादेवी कुपेकर, सुजित मिणचेकर, राजेश क्षीरसागर, पंजाबच्या अकाली दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष समरजितसिंग मान, माजी आमदार संजय घाडगे आदींनी या मोर्चाला पाठिंबा दिला.