पुणे । आगामी निवडणुकांमध्ये भाजप-शिवसेनेने युती करून एकत्र लढायचे की स्वतंत्र याबाबतचा निर्णय आता शिवसेनेने घ्यायचा आहे. युतीचा निर्णय घेण्याची जबाबदारी भाजपची नाही. शिवसेना एकत्र आली तर एकत्र, नाहीतर स्वतंत्र लढण्याचा मार्ग दोघांसाठीही खुला आहे. स्वतंत्र लढलो तरी तितक्याच दिमाखात महाराष्ट्रात पुन्हा निवडून येऊ, असे राज्याचे वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गुरूवारी स्पष्ट केले. त्यामुळे युतीचा चेंडू भाजपकडून पुन्हा शिवसेनेच्या कोर्टात टोलविण्यात आला आहे. वन विभागातर्फे राज्यात 13 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. त्याबाबत मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे विभागाची आढावा बैठक झाली. त्यानंतर पत्रकार परिषदेत मुनगंटीवार बोलत होते.
…तर भाजप एकटा लढेल
भाजप व शिवसेना दोन्ही एकाच विचाराचे पक्ष असल्याने त्यांनी एकत्र लढावे, अशी भूमिका एक कार्यकर्ता व महाराष्ट्राचे हित लक्षात घेवून मी अनेक वेळा मांडली. युती तोडण्यात भाजपचे नाव येऊ नये तर युती जोडण्यात भाजपचे नाव यावे, असा प्रयत्न आहे. मात्र, युती संदर्भातील निर्णय शिवसेनेने घ्यायचा आहे. शिवसेना एकत्र लढण्यास तयार असेल तर एकत्र निवडणूक लढविली जाईल. शिवसेना बरोबर आली नाही तर भाजप एकटा निवडणूक लढवेल आणि महाराष्ट्रत पुन्हा निवडून येईल, असा दावाही मुनगंटीवार यांनी यावेळी केला.