स्वतःची आवड ओळखून क्षेत्र निवडावे- वेलणकर

0

जैन स्कूलतर्फे गुणवंतांचा सत्कार

तळेगाव दाभाडे- विद्यार्थ्यांना आपली आवड ठावूक असते. आपली आवड काय आहे, जे क्षेत्र निवडणार त्याचा अभ्यासक्रम आपल्याला झेपणार का आदी गोष्टींचा विचार विद्यार्थ्यांनी केला पाहिजे. आत्मपरिक्षण करून आवडणारे, झेपणारे क्षेत्र निवडले तर चांगला वाव नक्कीच मिळेल. त्यात तुम्ही यशस्वी होणारच. ज्या अभ्यासक्रमाचा विचार करतो आहोत, त्यातच आपल्याला नक्कीच यश मिळेल. पालकांनीही आपली आवड विद्यार्थ्यांवर थोपवू नये, असे मत व्याख्याते विवेक वेलणकर यांनी व्यक्त केले.

जैन इंग्लिश स्कूलमध्ये इयत्ता 10 वी व 12 वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष दीपक शहा, पालक प्रतिनिधी रवींद्र भेगडे, शाभचेअरमन प्रकाश ओसवाल, किरण परळीकर, दिलीप पारेख, राकेश ओसवाल, रिकाबचंद गुंदेशा, पद्म ओसवाल, विलास शहा, दिलीप वाडेकर, शिक्षक, पालक, विद्यार्थी उपस्थित होते.

कष्टाची तयारी ठेवल्यास यश नक्की
यावेळी वेलणकर पुढे म्हणाले की, पालकांनी आधुनिक प्रलोभने देऊ नयेत. मोबाईल सारखा राक्षस पाल्याच्या हातात सोपवून स्वतःच्या पायावर कुर्‍हाड मारून घेऊ नका. प्रचंड कष्टाची तयारी ठेवली तर यश नक्कीच मिळेल. डॉ. दीपक शहा म्हणाले की, मार्क म्हणजे सर्वस्व नाही. विद्यार्थ्याची गुणवत्ता, कौशल्य, सादरीकरण हे महत्वाचे असते. ते जमत असेल तरच तो स्पर्धेत टिकून राहतो. विद्यार्थी प्रतिनिधी सुरभी जोशी, श्‍वेता वर्‍हाडे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रकाश ओसवाल यांनी प्रास्तविक केले. तर कविता फाकटकर यांनी सूत्र संचालन केले, आभार किरण परळीकर यांनी मानले.