स्वतःच्या कौतुकाचा सोहळा पाहायला ते शेतकरीच नव्हते

0

मुंबई : शेतकरी हा राज्याचाच नव्हे तर देशाचा आत्मा मानला गेला आहे. कृषिप्रधान असलेल्या या राज्यात शेती आणि शेतकऱ्यांचे महत्व अफाट आहे. राज्य सरकारच्या वतीने चार वर्षाच्या दीर्घ अवधीनंतर कृषी क्षेत्रातील महत्वाच्या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. या पुरस्कार सोहळ्यात तीन शेतकरी आपला सन्मान स्वतः स्वीकारू शकले नाहीत. पुरस्कार द्यायला 4 वर्षांचा अवधी गेल्यामुळे हे तिघांना हा सन्मान स्वीकारता आला नाही. कौतुक स्वीकारण्याआधीच मृत्यू आल्याने त्यांच्या पत्नी व मुलांनी भरल्या डोळ्यांनी सन्मान स्वीकारला. यावेळी अख्खे सभागृह भावूक झालेले दिसून आले.

जळगावचे उद्यानपंडित रवींद्र पाटील
जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील चिंचोली या गावात नावाजलेले शेतकरी उद्योजक म्हणजे रवींद्र मार्तंड पाटील. 6 महिन्यांपूर्वी 10 नोव्हेंबर 2016 रोजी त्यांचे निधन झाले. बनाना रायपनिंग सेंटर म्हणजे केळी पिकवणी सयंत्र, पॉली हाऊस, जरबेरा, डाळिंब, फळ, आंबा, पेरू, केळी फळबाग उत्पादन अशा विविध प्रकारच्या उत्पादनांवर त्यांनी मोठे काम केल्यामुळे त्यांना सरकारने उद्यानपंडित म्हणून सन्मानित केले. त्यांचा मुलगा सचिन रवींद्र पाटील, संदीप रवींद्र पाटील व पत्नी हिराबाई रवींद्र पाटील यांनी हा पुरस्कार राज्यपालांच्या हस्ते स्वीकारला. रवींद्र पाटील यांनी शेती चर्चासत्रांद्वारे शेतकरी मार्गदर्शन, शेती कार्यशाळा यामध्ये दरवर्षी सक्रिय सहभाग घेत होते. गावातील शेतकऱ्यांचा गट तयार करून मार्गदर्शन करण्याचे काम परिसरात केले होते.

सिल्लोडचे कृषिमित्र राजेश चोबे
पानवडोद ता. सिल्लोड, जिल्हा औरंगाबाद येथील राजेश सुरेशराव चोबे यांचे 23 मार्च 2016 ला हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. याआधीच त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला होता. मात्र पुरस्कार कार्यक्रम न झाल्याने ते या सोहळ्याला मुकले. त्यांची पत्नी संगीता राजेश चौबे व मुलगा दर्शन राजेश चौबे यांनी हा पुरस्कार भरल्या डोळ्यांनी स्वीकारला. त्यांना वसंतराव नाईक कृषिमित्र पुरस्कार दिला गेला. परिसरातील शेतकऱ्यांना अगदी मैत्रीपूर्ण पद्धतीने शेतीच्या वेगवेगळ्या तंत्र आणि पद्धतीबद्दल ते माहिती द्यायचे. स्वताहून सगळीकडे फिरून ते शेतकऱ्यांना फायदा व्हावा ह्या दृष्टीने माहिती देत असायचे. त्यामुळे त्यांना शेतीमित्र हा पुरस्कार मिळाला.