स्वत:तील महाराज जागवा!

0

आज शिवजयंती. महाराष्ट्रातीलच प्रत्येकाला आपले वाटणार्‍या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिवस. शिवरायांना आपले मानणारा प्रत्येकजण आपापल्यापरीने शिवजयंतीचे सोहळे साजरे करतील. शिवरायांच्या प्रेरणादायी पोवाड्यांनी अंगावर रोमांच उभे राहील. जयघोषाने आसमंत निनादून जाईल. शिवजयंती मिरवणुकांमधील गुलालानं रस्ते माखतीलच अगदी सारा आसमंत अभिमानाच्या रंगाने रंगून जाईल. मात्र, अभिमानाचे भरते येणारा शिवजयंतीचा हा दिवस मावळेलही. त्यानंतर उजाडेल 20 फेब्रुवारीचा दिवस. शिवजयंतीनंतरचा दिवस. त्या दिवसापासून पुढच्या 19 फेब्रुवारीपर्यंतच्या तुमच्या-माझ्या जीवनावरच आज लिहीत आहे.

शिवजयंतीला जणू शिवभक्तांमध्ये शिवरायच संचारलेले असतात. मधल्या काळात तरुणांमध्ये शिवरायांसारख्या दाढी-मिशांची फॅशन आली. अनेक ठिकाणी तसे तरुण दिसू लागले. आताही दिसतात. शिवजयंतीच्या मिरवणुकांमध्ये तर असे अनेक दिसतात. भगवा फेटा बांधून शिवरायांच्या गगनभेदी जयघोष करताना आपल्यातच जणू शिवराय संचारलेत असे वाटत असते. मात्र, दुसर्‍या दिवसापासून फक्त फॅशन तीच राहते. मात्र, पॅशन हरपलेली असते. असे घडते, हे नाकारून चालणार नाही. काही अपवाद असतील. नव्हे आहेतच! पण ते क्वचितच. असे का घडते? कारण ज्यांचे जीवन आपण आचारा-विचारातून जगले पाहिजे, आपण ते फक्त दिखाऊपणापुरतेच उचलतो. समाजमाध्यमांमध्ये एखादा विचार कॉपी करून दुसरीकडे पोस्ट करण्यासारखेच. डोळ्यांना दिसते म्हणून कॉपी पोस्ट. डोक्यात काही जात नाही. हे सर्वच महापुरुषांबाबतीत त्यांचे अनुयायी म्हणवणार्‍यांकडून अनवधानाने का होईना पण घडतेच घडते. तसे घडू नये. महाराजांबाबतीत तर नाहीच नाही!

त्यासाठीच महाराज लक्षात ठेवण्याची गरज आहे. फक्त शिवजयंतीपुरते नाही तर नेहमीच. शेवटच्या श्‍वासापर्यंत. जो राजा जगात तोवर कोणीच जगला नव्हता तसे जगला. त्याचे अनुयायी म्हणवायचे असेल तर आपल्याला तसेच जगावे लागेल. त्यासाठीच महाराजांना समजून घ्यावे लागेल.

छत्रपती शिवाजी महाराज हे तीन-चार शतकांनंतरही या मातीत, मातीतल्या माणसांच्या मनामनांत विराजमान आहेत. त्याचे कारण एकच ते तुमचे, माझे, आपले सर्वांचे राजे होते. आपले राजे होते. खूपच वेगळे. जगावेगळे राजे होते. हे उगाच बोलायचे म्हणून लिहीत नाही. आहेच तसे.

खूप मोठा भौगोलिक पसारा नसतानाही शिवराय लक्षातच नाही, तर मनामनांत वसले. त्याचे कारण इतर अनेक राजा-महाराजांनी, सम्राटांनी स्थापन केले ते त्यांचे साम्राज्य होते. शिवरायांनी जे स्थापले ते आपले स्वराज्य होते! इतर सम्राटांचे साम्राज्य आणि शिवरायांचे रयतेचे स्वराज्य! प्रत्येकाला ते आपले राज्य वाटायचे.
राजेशाही थाट या शब्दातूनच, राजा म्हटला की थाट हे स्पष्ट होते. मात्र, सत्ता असूनही योगी जीवन जगणार्‍या शिवरायांसारखे श्रीमानयोगी विरळेच! राजे-महाराजे सोडाच, पण अगदी छोट्या-मोठ्या संस्थानिकांचा उल्लेख करताना त्यांच्या महालाची वर्णने केली जातात. पण लोकांचा हा राजा वेगळाच त्याने स्वत:साठी आवश्यकतेनुसार महाल बांधलेही असतील, पण ते गरजेनुसार होते सुखोपभोगासाठी आलिशान अय्याशीचे अड्डे नव्हते. रयतेचे हाल करून सुखोपभोगासाठी महाल बनवणारा हा राजा नव्हताच! महाल न बांधता या राजाने देशासाठी किल्ले बांधले.

थोडेसे यश मिळाले की आहे ते टिकवून ठेवत स्वत:पुरते जगणारे अनेक. सत्तेतील अनेकांची तर तशी मनोवृत्ती असतेच असते. मात्र, राजे त्या मांडलिक, संस्थानिकी गुलाम कोत्या मनोवृत्तीचे नव्हतेच. जिजाऊंचा पुत्र तसा असूच शकत नव्हता. जिजाऊंकडून स्वाभिमानाचे बाळकडू मिळालेले शिवराय तसे करूच शकत नव्हते. ते गरुड होते. अखंड अविरत अथक उड्डाण करत सार्‍याचा वेध घेत राहणारे. काळाचा पुढचा विचार करणारे. त्यामुळेच त्यांनी कोणत्याही भारतीय राजाने केला नाही ते नौदलाचे महत्त्व जाणले. त्यातूनच आणखी एक महत्त्व कळते राजांचे. कर्मकांडाला काडीचेही महत्त्व न देण्याचे. अंधश्रद्धांविरोधी असे! नाहीतर ज्या देशात समुद्र ओलांडणे हे महापाप मानणार्‍या काळात आणि देशात या राजाने नौदल उभारणे कमी हिमतीचे नव्हते तसेच जलदुर्गांची उभारणी. केवळ उत्तरेतून येणारा औरंगजेब, मोगल हे शत्रू नाहीत तर शत्रू समुद्रातूनही येऊ शकेल, त्याला रोखण्यासाठी नौदल, जलदुर्ग आवश्यकच! या विचारांमधून महाराजांनी दर्यासारंग कान्होजी आंग्रे यांच्यासारखी माणसे हेरत नौदल उभारले.

सत्ता ही उपभोगासाठी नसते तर सेवेसाठी, संरक्षणासाठी असते. छत्रपती हे मिरवण्याचे पद नाही, तर जबाबदारीचे वाण आहे. हे जाणून त्यांनी शत्रूंच्या महिलांचीही सन्मानाने पाठवणी केली. त्यातून आपल्या सैनिकांसमोर आपला वेगळा आदर्श ठेवला तसेच मोहिमेवर असताना शेतकर्‍यांच्या गवताच्या काडीलाही हात लावायचा नाही, ही तंबी स्वत:च्या सैनिकांना देणारा जगभरातील एक तरी राजा दाखवा!

राजे हजारोंनी झाले, सम्राटही शेकडोंनी झाले. ते आले आणि गेले. शिवछत्रपती मात्र आजही आपल्या मनात विराजमान आहेत. त्याचे कारण एकच ते एकमेवाद्वितीय असे छत्रपती शिवाजी महाराज होते. रयतेचे राजे! त्यांच्यासारखे तेच!! ते आपले राजे. मात्र, आपण त्यांना फक्त उत्सव सोहळ्यांपुरते मर्यादित करू पाहतो, तसे होऊ नये. केवळ फॅशन नाही तर पॅशन म्हणून महाराजांना स्वत:त भिनवलेच पाहिजे. महाराजांना आपण जगलंच पाहिजे. कायमच! त्यासाठी गरज आहे ती स्वतःमध्ये महाराजांना जागवण्याची!