स्वदेशी बनावटीच्या पृथ्वी-2 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

0

बलसोर । भारताकडून शुक्रवारी स्वदेशी बनावटीच्या अणवस्त्रसज्ज पृथ्वी-2 या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करण्यात आली. ही चाचणी ओडिशातील भारतीय लष्कराच्या तळावर पार पडली. पृथ्वी-2 जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र असून या क्षेपणास्त्राच्या सहाय्याने 350 किलोमीटरवरील लक्ष्याचा अचूक वेध घेता येऊ शकतो. ओडिशाच्या चंदिपूर येथील एकात्मिक चाचणी तळावरून (आयटीआर) सकाळी 9 वाजून 50 मिनिटांनी मोबाईल लाँचरच्या सहाय्याने पृथ्वी-2 क्षेपणास्त्र डागण्यात आले.

ही चाचणी यशस्वी ठरल्याचे आणि या मोहिमेची सर्व उद्दिष्टे सफल झाल्याचे लष्करी सूत्रांकडून सांगण्यात आले. पृथ्वी-2 या क्षेपणास्त्रात द्रव इंधन असणार्‍या दोन इंजिनांचा (लिक्विड प्रोपल्शन) वापर करण्यात आला आहे. पृथ्वी-2 मध्ये 500 ते 1000 किलो अणवस्त्रे वाहून नेण्याची क्षमता आहे. याशिवाय, लक्ष्याचा अचूक वेध घेण्यासाठी क्षेपणास्त्रात दिशादर्शन प्रणालीही आहे.

क्षेपणास्त्राचा मार्ग संरक्षण संशोधन व विकास संस्थेचे रडार, विद्युत प्रकाशीय मागोवा यंत्रणा, दूरसंवेदन केंद्रे यांच्या मदतीने निश्‍चित करण्यात आला होता. पृथ्वी 2 क्षेपणास्त्र 2003 मध्ये भारताच्या लष्करी दलांमध्ये समाविष्ट करण्यात आले असून भारताच्या एकात्मिक क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमात तयार केलेले ते पहिले क्षेपणास्त्र मानले जाते, आता ते तंत्रज्ञानाने परिपूर्ण असून त्याबाबत कुठलीही शंका उरलेली नाही. अशा प्रकारची क्षेपणास्त्र उड्डाणे भारताच्या प्रत्यक्ष कार्यात्मक सज्जतेची साक्ष देतात व आपल्याकडे असलेली सगळी क्षेपणास्त्रे गुणवत्तेत कुठेही कमी नाहीत हेच यातून स्पष्ट होते. पृथ्वी 2 क्षेपणास्त्राची यापूर्वीची उपयोजित चाचणी 26 नोव्हेंबर 2015 रोजी ओडिशातील याच चाचणी क्षेत्रातून घेण्यात आली होती.