मोहन कुलकर्णी यांचे प्रतिपादन
पिंपरी : प्रत्येकाने आपल्या धर्माचा स्वाभिमान बाळगायला हवा. स्वधर्माचा स्वाभिमान बाळगत असताना इतर धर्माचा अवमान होणार नाही, याची काटेकोरपणे काळजी घ्यायला हवी. इतर धर्मांचा आदर करणे हे सुसंस्कृतपणाचे लक्षण आहे. असे प्रतिपादन मोहन कुलकर्णी यांनी केले. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्यावतीने भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्त बुधवारी शोभायात्रा काढण्यात आली. चिंचवड देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदारदेव महाराज यांच्या हस्ते मंगलमूर्तीवाडा येथून दुपारी शोभायात्रेची सुरुवात झाली. ही शोभायात्रा मोरवाडी, मासुळकर कॉलनी, अजमेरा कॉलनी, नेहरुनगर, लांडेवाडीमार्गे भोसरीतील अंकुशराव लांडगे सभागृहापर्यंत काढण्यात आली. शोभायात्रेनंतर लांडगे सभागृहात जाहीर सभा घेण्यात आली. सभेमध्ये प्रमुख वक्ते म्हणून उपस्थितांना मार्गदर्शन करताना मोहन कुलकर्णी बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष उदय महाडिक उपस्थित होते. तसेच यावेळी माजी नगरसेवक गजानन चिंचवडे, महासंघाचे प्रदेश कार्याध्यक्ष विश्वजीत देशपांडे, महिला सरचिटणीस संजीवनी पांडे, जितेंद्र कुलकर्णी, शहर अध्यक्ष दिलीप कुलकर्णी, उपाध्यक्ष राजन बुडूख, कार्याध्यक्ष पुष्कराज गोवर्धन, सरचिटणीस महेश बारसावडे, सुहास पोफळे, दीपक जाधव आदी उपस्थित होते.
वाचनसंस्कृती वाढवायला हवी
मोहन कुलकर्णी पुढे म्हणाले की, काही लोकांकडून इतिहास बदलून किंवा चुकीच्या पद्धतीने सांगितला जात आहे. त्यामुळे इतरांवर विश्वास न ठेवता, प्रत्येकाने वैयक्तिक दाखले तपासून बघायला हवेत. वाचनसंस्कृती वाढवायला हवी. सांगीव आणि ऐकीव गोष्टींवर आपण विश्वास ठेवत असल्यामुळे आपल्या समाजामध्ये तेढ निर्माण करण्यात येत आहे. योग्य इतिहास लोकांपर्यंत पोहोचवायला हवा. समाजाच्या एकतेमध्येच समाजाचे हित सामावलेले आहे. उदय महाडिक म्हणाले की, काही दुष्प्रवृत्तींमुळे समाजाचा सन्मान लयाला गेला आहे. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ हा सन्मान परत मिळवून देण्याचे काम करीत आहे. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या कार्यात सर्वांना सहभागी करून समाजाच्या प्रगतीच्या कक्षा रुंद करायला हव्यात.