जळगाव । मोठी स्वप्ने बघा आणि त्या स्वप्नपूर्तीसाठी सातत्याने प्रयत्न करा. मात्र हे प्रयत्न करत असताना स्वत:ला फसवू नका, त्यामुळे तुमचेच नुकसान होणार आहे असा सल्ला नुकत्याच आय.ए.एस.परीक्षा उत्तीर्ण झालेल्या आशिष पाटील यांनी दिला. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात सुरु असलेल्या राष्ट्रीय सेवायोजनेच्या राज्यस्तरीय प्रेरणा नेतृत्व विकास शिबिराचा समारोप रविवारी आशिष पाटील आणि जळगाव जिल्हयाचे पोलिस अधिक्षक दत्तात्रय कराळे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठया उत्साहात झाला. यावेळी आशिष पाटील बोलत होते. विशेष कार्य अधिकारी प्रा.पी.पी.माहुलीकर अध्यक्षस्थानी होते.
आपल्यातील शक्तीस्थाने शोधा…
राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आशिष पाटील यांनी स्पर्धा परीक्षेबाबत काही टिप्स् दिल्या. मी स्वत: बारावी पर्यंत विशेष प्राविण्य प्राप्त विद्यार्थी नव्हतो. परंतु पदवीचे शिक्षण घेत असताना आय.ए.एस.होण्याचे स्वप्न पाहिले आणि प्रामाणिकपणे प्रयत्न केले. स्पर्धा परीक्षांमध्ये अपयशही आले परंतु खचून न जाता खूप अभ्यास केला. माझी मेमरी कमी असल्यामुळे वेगवेगळया टेक्नीक्सचा वापर केला. विद्याथ्र्यांनी आपण स्पर्धा परीक्षेसाठी पात्र आहोत की नाही याबाबत आत्मपरीक्षण करावे. आपल्यातील शक्तीस्थाने, कमकूवतपणा, संधी आणि धोके याचा शोध घ्यावा. स्वत:ला फसवू नका असेही आवाहन त्यांनी केले.
कोणत्याही प्रसंगात हताश न होता शिवरायांना आठवा
पोलिस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी देखील टिप्स् देताना विद्यार्थ्यांना सांगितले की, स्पर्धा परीक्षेसाठी दृढ निश्चय महत्वाचा आहे. त्यानंतर कोणत्या परीक्षेला बसायचे हे ठरवा. त्याचा अभ्यासक्रम आणि प्रश्नपत्रिका पहा. खूप पुस्तके वाचण्यापेक्षा मोजकी पुस्तके वाचा. स्वत: नोटस् काढा, आत्मपरीक्षण करा, स्वत:ला जेवढे वाटते तेवढा अभ्यास करा. स्पर्धा परीक्षेएवढीच किंबहुना त्याही पेक्षा आयुष्याची परीक्षा फार अवघड आहे. कोणत्याही प्रसंगात हताश न होता शिवरायांना आठवा, न्युनगंडापासून दूर रहा असा सल्ला त्यांनी दिला. अध्यक्षीय भाषणात प्रा.माहुलीकर यांनी चांगली मानसिकता, सहनशिलता आणि शिस्त अंगी असली तर ध्येय गाठता येते असे सांगितले.
यावेळी शिबिराचे समन्वयक प्रा.अजय सुरवाडे यांनी प्रास्ताविकात शिबिराचा आढावा घेतला.विद्यार्थ्यांच्या वतीने काजल चव्हाण (लोणेरे), यश शिंदे (पुणे) यांनी तर संघ व्यवस्थापकांच्या वतीने प्रा.शिवाजी जाधव (नांदेड), प्रा.प्रीती श्रीवास्तव (नागपूर) यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी विद्यार्थी विकास विभागाचे प्रभारी संचालक प्रा.एस.टी.इंगळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुभाष पवार यांनी केले. प्रा.मनोज पाटील यांनी आभार मानले.
महावितरणतर्फे सद्भावना दिवस साजरा
जळगाव। महावितरणच्या जळगांव परिमंडळातर्फे विद्युत भवन येथे सद्भावना दिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी अधिक्षक अभियंता दत्तात्रय बनसोडे यांनी उपस्थित अधिकारी कर्मचार्यांना सद्भावना दिवस प्रतिज्ञा दिली. याप्रसंगी कार्यकारी अभियंता धनंजय मोहोड, वरिष्ठ व्यवस्थापक रामचंद्र वैदकर, विलास फुलजले, उपकार्यकारी अभियंता नितीन पाटील, रविंद्र पवार, राजेश पाटील, अतुल पाटील, गिरीष चौधरी, देवेंद्र सिडाम, सिमा मंगळे, दत्तात्रय निरगुडे, जनसंपर्क अधिकारी किशोर खोबरे, सचिन कोळी, प्रविण चौधरी, देवेश बाविस्कर, अनिल टाक, राजेश अहेर, उमाकांत विसपुते, रविंद्र चौधरी आदी उपस्थित होते.