स्वप्रतिष्ठा जीवनाचा आधार!

0

रंग, रूप, पैसाअडका, सोशल स्टेट्स यापेक्षाही महत्त्वाची आहे ती स्वप्रतिष्ठा. कारण यातल्या किती तरी गोष्टी नसल्या तरी माणसाचे कुठेच काहीही अडत नाही. मात्र, स्वप्रतिष्ठेच्या जाणीवेचा अभाव असेल तर जगणं नकोस होऊन जाते. लहान मुले, तरुण वयातील मुले, सर्वांनाच स्वप्रतिष्ठा आवश्यक असते. स्वप्रतिष्ठेत सर्वप्रथम आपण जसे आहोत तसे स्वीकारणे आवश्यक असते. स्वत:बद्दल विश्‍वास वाटायला हवा की, हो, मी हे करू शकतो. सकारात्मक दृष्टिकोन मनात ठेवून विचार करायला हवा असतो. स्वप्रतिष्ठा म्हणजे स्वत:विषयी प्रतिष्ठा वाटायला हवी. कारण याचा परिणाम तुमच्या मानसिक आरोग्यावर होत असतो.

एकदा मानसिक आरोग्य ढासळले की, त्याचा परिणाम व्यक्तीच्या वागण्यावर होतो, त्या व्यक्तीच्या वागण्यात दिसून येतो. स्वत:ला कमी लेखणारी मुले मग निर्णयही त्याच पद्धतीने घेतात. त्यांच्या मित्रमंडळींच्या निवडीत, मैत्रीत, नात्यात हे दिसून येते. ते अडचणींना तोंड देऊ शकत नाहीत, अशा मुलांच्या मनाला या विचारांनी अक्षरश: झपाटलेले असते. कमीपणाची भावना त्यांना भूतासारखी छळत असते. जेव्हा मुलांची स्वप्रतिष्ठा खाली जायला लागते तेव्हा त्यांच्या जगण्याचाच प्रश्‍न निर्माण होतो. तेव्हा मुलांना अशा मनःस्थितीतून बाहेर काढून त्यांची स्वप्रतिष्ठा उंचावण्यासाठी काही गोष्टी त्यांना जाणीवपूर्वक माहीत करून द्याव्या लागतात. प्रथम म्हणजे स्वत:वर प्रेम करा. चुका होतात म्हणून स्वत:ला माफ करा. कारण स्वत:ला स्वीकारले, प्रेम केले, चुका मान्य करून स्वत:ला माफ केले, तरच पुढचा प्रयत्न करता येतो आणि दुसर्‍यालाही स्वीकारता येते. माफ करता येते. मुलांच्या, तरुणांच्या स्वप्रतिमेला बळ देतात. त्यांची स्वप्रतिष्ठा वाढवतात. तुम्ही स्वत:ला कमी लेखाल, वाईट वागाल, सतत नावे ठेवत राहाल, दोष काढत राहाल आणि तुम्ही स्वत:शी वागण्याची जी पातळी ठरवाल, इतर लोकही तुमच्याशी तसेच वागतील, याची जाणीव परिपक्व आणि प्रगल्भ अशा मोठ्यांनी मुलांना द्यावी.

– प्रदीप चव्हाण, जळगाव.