स्वबळावर लढून जिंकणारच

0

युवा सेनाअध्यक्ष आदित्य ठाकरेंची गर्जना
भाजपने पालघर निवडणुकीत चीटिंग केली

मुंबई : शिवसेनेची ताकद आख्ख्या महाराष्ट्राला ठाऊक आहे. आता स्वबळावर लढून एकहाती सत्ता आणणारच, अशी गर्जना युवा सेना प्रमुख तथा शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केली आहे. शिवसेनेचा मंगळवारी 52 वा वर्धापन दिन साजरा होत आहे. यंदा हा सोहळा षण्मुखानंद हॉलऐवजी गोरेगाव येथील नेस्को संकुलात आयोजित करण्यात आला होता. या यावेळी आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा स्वबळ आजमावण्याची गर्जना केली आहे.

आदित्य ठाकरे म्हणाले, सेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा बुलंद आवाज काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत घुमला. त्यांचा आशीर्वाद आपल्यावर आहे. शेतकर्‍यांचे प्रश्‍न सोडवण्याचे काम शिवसेनेने जेवढ्या प्रमाणात केले ते कोणताही पक्ष करू शकत नाही. शिवसैनिक जनसेवेसाठी सर्वात पुढे असतो. जात-धर्म न पाहता शिवसैनिक कठीण काळात रक्तदानाला उभा राहतो, असेही आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

भाजपने चीटिंग करून पालघर जिंकले…
पालघर लोकसभा पोटनिवडणूक भाजपने चीटिंग करून जिंकली आहे. त्यामुळे शिवसेनेला आता समाजकारणाइतकेच राजकारण करणेही गरजेचे झाले असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. युवा सेनेचे प्रमुख तथा शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या हस्ते कार्यक्रमांची सुरुवात झाली असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे समारोप करणार आहेत. भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्याबरोबरची भेट आणि शिवसेनेची आगामी भूमिका याबाबत उद्धव ठाकरे काय बोलतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे. तसेच भाजपच्या धर्तीवर शिवसेनाही बूथ प्रमुख सक्षम करण्यावर या कार्यक्रमात विशेष लक्ष देणार आहे.