मुंबई। तत्कालीन महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी डॉन दाऊद इब्राहिम याच्याशी बातचीत केल्याचा दावा करून प्रचंड खळबळ उडवून देणारा कथित हॅकर मनीष लिलाधर भंगाळे याला मुंबई क्राईम ब्रँचने अटक केल्याने खळबळ उडाली आहे. पुणे येथील माहिती अधिकार कार्यकर्ते रवींद्र बर्हाटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्याला अटक करण्यात आली आहे. मनीष भंगाळे हा तद्दन खोटे बोलत असल्याचा गौप्यस्फोट ‘जनशक्ति’ने केला होता. त्याने जळगाव येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ‘जनशक्ति’च्या सहकार्यांनी विचारलेल्या एकाही प्रश्नाचे उत्तर त्याला देता आले नव्हते. आधीच मुंबई उच्च न्यायालयाने त्याची याचिका फेटाळून लावत एकनाथराव खडसे यांनी क्लिन चीट दिली होती. यात आता गुन्हा अन्वेषण विभागाने त्याला अटक करून या प्रकरणातील खोटेपणा दाखवून दिला आहे. दरम्यान, न्यायालयाने भंगाळेला शुक्रवारी तब्बल सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
काय आहे प्रकरण : मूळचा जळगाव जिल्ह्यातील आणि सध्या गुजरातमध्ये वास्तव्यास असणार्या मनीष लिलाधर भंगाळे या हॅकरनेे दाऊदचे कॉल ट्रेस केल्याचा दावा केला होता. 2014 ते 2015 दरम्यान हॅकिंग करून दाऊदनं कुणा-कुणाला कॉल केले होते, याची माहिती त्यानं काढली होती. दाऊदच्या कॉल लिस्टमध्ये त्याला मिळालेल्या एकूण 10 चार मोबाइल क्रमांकांमध्ये एक नंबर खडसेंचा असल्याचं त्यानं म्हटलं होतं. या संदर्भात 28 एप्रिल रोजी त्याने एका हिंदी वृत्तवाहिनीवर कार्यक्रमाच्या माध्यमातून गौप्यस्फोट केला होता. यात त्याने खडसे यांचे नाव घेतले नव्हते. तथापि यानंतर त्याने पत्रकार परिषद घेऊन त्यानं खडसे यांच्यावर आरोप करत त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी केली होती.
‘जनशक्ति’ने दिला दणका :मनीष भंगाळेच्या दाव्याला आव्हान देण्याचे काम फक्त ‘जनशक्ति’ने केले होते. जगातील कोणत्याही देशातल्या कायद्यामध्ये हॅकींगमधून मिळालेल्या माहिती कायदेशीर दर्जा नसतांनाही मीडियाने कोणतीही शहानिशा न करता त्याला डोक्यावर घेतले होते. प्रारंभी ‘जनशक्ति’च्या खान्देश आवृत्तीचे कार्यकारी संपादक शेखर पाटील यांनी त्यांच्या ब्लॉगवर याबाबत पुराव्यांसह लेख लिहला. नंतर हा लेख ‘एबीपी माझा’ने प्रसिध्द केला. यथावकाश मनीष भंगाळे जळगावात मोठ्या आत्मविश्वासाने पत्रकार परिषद घेण्यासाठी आला असता त्याला ‘जनशक्ति’च्या सहकार्यांनी विचारलेल्या प्रश्नांनी त्यांची अक्षरश: बोबडी वळाली. त्याने ही पत्रकार परिषद गुंडाळून टाकली. यथावकाश मुंबई उच्च न्यायालयानेही त्याचा हा दावा तकलादू असल्याचे सांगितले. आता तर त्याला अटक करण्यात आल्याने एक वर्तुळ पूर्ण झाले आहे. खरं तर त्याला आधीच अटक करणे आवश्यक होते. असो. उशीरा का होईना आता त्याच्या चौकशीतून सत्य समोर यावे हीच अपेक्षा.
खडसेंचा राजीनामा
गेल्या मे महिन्यात एकनाथराव खडसे यांच्यावर एकामागून एक असे अनेक आरोप करण्यात आले होते. यातच मनीष भंगाळेने केलेल्या आरोपांमुळे प्रचंड खळबळ उडाली होती. यातून त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. या कालखंडात भंगाळे याने सातत्याने खडसेंवर आरोपांच्या फैरी झाडल्या होत्या. एवढेच नव्हे तर मुंबई उच्च न्यायालयात त्याने याचिका दाखल करत खडसेंवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली होती. तथापि न्यायालयाने त्याची ही मागणी फेटाळून लावत त्याची याचिका खारीज केली होती. यानंतर त्याने अनेकदा या प्रकरणी पोलीस योग्य सहकार्य करत नसल्याचा आरोप केला होता. मात्र यातील फोलपणा लक्षात आल्यामुळे त्याच्या आदळआपटीकडे कुणी लक्ष देत नव्हते. अखेर त्याला आता गजाआड करण्यात आले आहे.
6 एप्रिलपर्यंत कोठडी
पुणे येथील माहिती अधिकार कार्यकर्ते रवींद्र बर्हाटे यांनी दाऊदशी कथितरित्या कॉल केल्याच्या प्रकरणात आ. एकनाथराव खडसे यांची बदनामी झाल्याचा दावा करत मुंबईच्या क्राईम ब्रँचकडे तक्रार दाखल केली होती. या अनुषंगाने गुरूवार दिनांक 30 मार्च रोजी दुपारी मनीष भंगाळे याला क्राईम ब्रँचच्या एका पथकाने ताब्यात घेतले. त्याच्यावर भादंवि कलम 468, 471 आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम 66 डी अन्यये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता मनीष भंगाळे याला 6 एप्रिलपर्यंत म्हणजे तब्बल सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
इतरांविरूध्दही लवकरच कारवाई- खडसे
दरम्यान शुक्रवारी दुपारी आ. एकनाथराव खडसे यांनी आपल्या निवासस्थानी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत मनीष भंगाळेला अटक झाल्याच्या घटनेवर भाष्य केले. ते म्हणाले की, भंगाळे हा आपल्यावर जाणीवपूर्वक खोटे आरोप करत असतांना काही जणांनी त्याला पडद्याआड मोठ्या प्रमाणात मदत केली. यात जळगावातील काही जणांनी त्याला विविध पातळ्यांवरून मदत केल्याचे ठोस पुरावे आपल्याकडे आहेत. या ‘एफआयआर’मध्ये त्यांची नावे नसली तरी लवकरच त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली.
हॅकींगचा केला होता दावा : मनिष भंगाळे याने देशातील 5 मोबाईल क्रमाकांवर दाऊदच्या पत्नीने 5 सप्टेबर 2015 ते 5 एप्रिल 2016 या काळात संभाषण झाल्याचा दावा केला होता. पाकिस्तानची दुरसंचार कंपनीचे संकेतस्थळ हॅक करून दाऊदच्या कराची येथील पत्यावर नमुद असलेल्या क्रमाकांचे डिटेल्स् मिळविले होते. त्या पाच क्रमाकांमध्ये आसाम राज्यातील काँग्रेसचे नेते राणा गोस्वामी, राजस्थानमधील जुबेर खान, आंध्र प्रदेशमधील चिन्ना रेड्डी तर नवी दिल्ली मधील सतीश यांचा मोबाईल क्रमांक जाहीर करण्यात आला होता. दरम्यान, खडसे यांनी संबंधीत मोबाईल क्रमांक आपण वापरत नसल्याचे त्यांनी जाहीर केले होते. तसेच मनिष भंगाळेने आरोप केलेल्या काळात आंतरराष्ट्रीय कॉल त्या क्रमांकावर आलेला किंवा केलेला नसल्याचे त्यांनी जाहीर केले होते.