स्वयंपाकगृहातले भांडण स्वागतगृहात येताना पती-पत्नीने विसरुन जायला हवे !

0

धुळे । स्व यंपाक गृहातले भांडण घरातल्या सर्वात पुढे असलेल्या स्वागत गृहात येताना पती-पत्नीने विसरून जायला हवे. तेथे दरवळला पाहिजे प्रेम, वात्सल्य, स्नेह आणि आनंदाचा सुगंध. दीर्घकाळ आणि अखेरपर्यंत सुख देणारा हा गृहमंत्र भागवताचार्य खगेंद्रजी महाराज ब्राह्मणपुरीकर यांनी तमाम भाविकांना दिला. अहिल्या, सीता, तारा, द्रौपदी, मंदोदरी यांनी दिलेल्या विविध परीक्षा किती भयंकर होत्या. या परिक्षातून त्या उत्तीर्ण झाल्यात आणि त्यांच्याप्रती आपोआप प्रेम प्राप्त झाले. या पवित्र हिंदूस्थानात पन्नास-पन्नास वर्षे संसार अविटपणे केला जातो. असे उदाहरणही महाराजांनी यावेळी आवर्जून दिले.

कथा हे शास्र प्रवाह
कथेच्या प्रवाहाचे प्रकार आहेत. कथा हे शास्र प्रवाह आहे. शांती प्रवाह आहे. कथा ही शक्ती प्रवाह आहे. कथा ही शुद्ध प्रवाह आहे. कथा ही शरण प्रवाह आहे. जीवाला शरणांगतीची सवय करा. श्रोता हा लेबल नव्हे लेव्हल असलेला असायला हवा, असे ते यावेळी म्हणाले. यावेळी प्रवचन सोहळ्याच्या कार्यक्रमादरम्यान, कथेच्या प्रसंगानुरूप दही हंडी फोडण्याचा शानदार धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी झाला. श्रीकृष्णाने आपल्या सवंगड्यांच्या मदतीने उंच टांगलेली आणि सजवलेली हंडी स्पर्शताच उपस्थित भाविकांचा आनंद शिगेला पोहोचला. या सोहळ्यात महिला-पुरुष भाविकांनी नृत्य करून सहभाग दर्शविला.

प्रभुनाम नित्य गावे..
महाराज म्हणाले की, गर्भात असतांना मुलाला चव, स्वाद कळतो. तसे भजनही कळते. गर्भाबाहेर आल्यानंतर मात्र विस्मृती होते. ही विस्मृती घालविण्यासाठी प्रभू नाम जपावे. कथा एक प्रवाह आणि सरिता आहे. तुलसी रामायनाच्या बालकांडात याचे वर्णन आहे. भाव, भजन, भक्ती आणि भागवत हे चार शब्द प्रत्येकाच्या जीवनात धार्मिक महत्वाचे. या चार अक्षरांना घोटा. सगळ्याच शेतात तांदूळ पिकतात पण अक्षता बनून देवाच्या डोक्यावर स्थान मिळविणारे तांदुळाचे दाणे मात्र मोजकेच असतात.

आज समारोप
पवित्र अधिकमासाचे औचित्य साधून येथील महाराणा प्रताप हायस्कुलच्या प्रांगणात जयहिंद महाविद्यालयाच्या (ज्युनिअर) बाजूला भव्य श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सप्ताहाला प्रारंभ झाला आहे. कथेचे सहावे पुष्प गुंफताना भागवताचार्य खगेंद्रजी महाराज ब्राह्मणपुरीकर यांनी आपल्या अमृत वाणीतून विविध दृष्टांत दिले. बुधवार, 23 रोजी कथेचा समारोप होईल.