पालघर । तालुक्यातील माकुणसार बंधार्याला लागलेल्या गळतीने हजारो लिटर पाणी वाहून जाऊ लागल्याचे सह्याद्री मित्र परिवाराच्या तरुणांनी पुढाकार घेत श्रमदान करून बंधार्याची गळती थांबवली. या तरुणांनी बंधार्याची दुरुस्ती शासन करेल याची वाट न पाहता केलेल्या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे. माकुणसार गावचे माजी सरपंच विवेक राऊत यांनी दोन दिवसांपूर्वी मालजुई बंधार्याला गळती लागून हजारो लीटर पाणी वाया जात असल्याचे निदर्शनास आणून दिले. बांधारा काहीअंशी फुटल्याने त्यातून हजारो लीटर गोडे पाणी वाहून गेले, तर अल्पावधीतच बंधार्याचे पात्र कोरडे पडण्याची भीती तरुणांपुढे व्यक्त केली. त्यानंतर सह्याद्री मित्र परिवारातील तरुणांनी रविवारी दिवसभर राबून बंधार्याची गळती थांबवली.
तरुणांचे गावकर्यांकडून कौतुक
या तरुणांनी स्वयंप्रेरणेने श्रमदान करून बंधार्याची दुरुस्ती केल्याने संपूर्ण गावकर्यांनी त्यांचे कौतुक केले. हा बंधारा पाणी अडवा, पाणी जिरवा या संकल्पनेतून साकारण्यात आला असून याचे पाणी साधारणतः एप्रिलपर्यंत राहते. आज हा बंधारा दुरुस्त केला नसता तर जानेवारीमध्येच पाणीसाठा संपला असता. याच बांधार्यामुळे परिसरातील विहिरी आणि बोअरवेलना अगदी मे महिन्यापर्यंत गोड्या पाण्याची उपलब्धता राहते. त्यामुळे सह्याद्री मित्रांनी आज केलेली बांधार्याची दुरुस्ती महत्त्वपूर्ण असून सह्याद्री मित्र परिवारातील विवेक राऊत, दीपक पाटील, राकेश पाटील, भुपेश म्हात्रे, सर्वेश पाटील, निकेत पाटील आणि गौरव राऊत यांनी मेहनत घेतली.