स्वयंरोजगारातून प्राप्त करा प्रगतीची सुवर्णसंधी

0

जळगाव । सर्व सामान्य माणसाचं जीवनमान उंचवावे यासाठी प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून विविध योजना अंमलात आल्या आहेत. मुद्रा बँक योजनेच्याद्वारे लहान मोठ्या व्यावसायिकांना अर्थसहाय्य करण्याची योजना आहे. या योजनेची माहिती जाणून स्वयंरोजगाराची सुरुवात करुन आपल्या प्रगतीची सुवर्णसंधी साध्य करा, असे आवाहन राज्याचे वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री ना.गिरीष महाजन यांनी मुद्रा लोन मेळाव्यात सोमवारी केले. जिल्हास्तरीय मुद्रा बँक समन्वय समितीच्या वतीने जळगाव येथे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात मुद्रा लोन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तसेच महिलांची उपस्थिती लक्षणीय होती हे विशेष. या मेळाव्याचे उद्घाटन राज्याचे वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री ना. गिरीष महाजन यांच्या हस्ते झाले. त्यावेळी मार्गदर्शन करतांना ना. महाजन बोलत होते. यावेळी मुद्रा लोन मेळाव्यात जिल्हा परिषद अध्यक्ष उज्ज्वला पाटील, जळगाव शहरचे आमदार सुरेश भोळे, विधानपरिषद आमदार चंदूभाई पटेल,महापौर नितीन लढ्ढा, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, जिल्हा परिषदेचेमुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, उपविभागीय अधिकारी जलज शर्मा, जिल्हा नियोजन अधिकारी दिनेश वाघ आदी मान्यवर उपस्थित होते.

अनुदान थेट खात्यात
उपस्थितांशी संवाद साधतांना ना. महाजन म्हणाले की, प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य माणसाचे जीवनमान उंचावणार्‍या योजना अंमलात आणल्या आहेत. त्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने अंमलबजावणी सुरु केली आहे. योजना अंमलबजावणी करतांना भ्रष्टाचार होऊ नये यासाठी त्यांनी प्रत्येक योजनेचा लाभ थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात जावा यासाठी जनधन योजनेच्या माध्यमातून सर्वांना बँक खाती उघडावयास लावले. त्यामुळे आता अनुदानाचा लाभ थेट लाभार्थ्याच्या खात्यात जमा होतो.

बँकांमध्ये जाऊन योजनेची माहिती घ्या…
मुद्रा बँक योजना ही अशीच योजना आहे. आपल्याला उभारवयाच्या व्यवसाय उद्योगासाठी विनातारण कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी ही योजना आहे. आपल्या देशातील बेरोजगारीची समस्या समूळ नष्ट करण्यासाठी स्वयंरोजगाराला चालना देणारी ही योजना आहे. आपल्या व्यवसायासाठी बँकांमध्ये जाऊन या योजनेची माहिती घ्या आणि आपल्या प्रगतीची सुवर्णसंधी साधा, असे आवाहन त्यांनी केले.

पथनाट्यातून दिली योजनेची माहिती
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी विनोद ढगे आणि सहकार्‍यांनी पथनाट्य सादर करुन मुद्रा योजनेची माहिती उपस्थितांसमोर सादर केली. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मुद्रा योजनेचा लाभ घेऊन कर्जाची नियमित परतफेड करणार्‍या उन्नती महिला बचत गटाच्या कविता ज्ञानेश्वर पाटील, जास्वंद महिला बचत गटाच्या कलाबाई लक्ष्मण अहिरे, स्वामी रामेश्वर महिला बचत गटाच्या कल्पना पाटील व मंगला पेंढारकर यांना स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच स्व. प्रमोद महाजन कौशल्य विकास योजनेतील यशस्वी प्रशिक्षण पूर्ण केलेले प्रशिक्षणार्थी शैलजा पोंगे, मंगला भंगाळे, ममता नाले, पुनम शिवहारे यांनाही प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. तर मुद्रा योजनेतून अर्थसहाय्य घेऊन यशस्वी उद्योग चालविणार्‍या ‘देशपांडे बिरयाणी हाऊस’च्या संचालिका निलोफर देशपांडे यांनी आपले अनुभव कथन केले.

यावेळी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी मुद्रा योजना व जिल्हाभरातील नियोजित मुद्रा मेळाव्यांविषयी माहिती आपल्या प्रास्ताविकातून दिली. असे मेळावे प्रत्येक तालुक्यात दोन या प्रमाणे जिल्हात 30 मेळावे होतील अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनीही आपल्या मनोगतातून केंद्र शासन व राज्य शासनाच्या सर्वसामान्य माणसाच्या जीवनमान उंचावणार्‍या विविध योजना आणि या योजनांद्वारे सामान्यांना आपली प्रगती कशी साध्य करता येईल, याची विस्तृत माहिती दिली. आ. सुरेश भोळे यांनी आपल्या भाषणातून मुद्रा योजनेचा लाभ नागरिकांनी घ्यावा आणि आपला स्वतःचा व्यवसाय सुरु करावा. असे आवाहन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अपूर्वा वाणी यांनी केले.

अन् भ्रष्टाचाराला आळा
यावेळी ना.महाजन यांनी उपस्थितांना प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत नागरिकांना घरे देणार्‍या योजना, स्वच्छ भारतअभियान अंतर्गत हागणदरी मुक्त योजना अशा विविध योजनांची माहिती दिली. देशातील आणि राज्यातील सरकार हे शेतकरी आणि सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून आपले अर्थविषयक धोरण ठरवत असल्याचे सांगून ते म्हणाले की,मोबाईल क्रांतीमुळे डिजीटल आर्थिक व्यवहार सुरळीत झाले आहेत. त्यामुळे भ्रष्टाचाराला आळा बसविण्यात मोठ्या प्रमाणावर यश मिळत आहे,असेही त्यांनी सांगितले.