पंडीत तळवलकर यांच्या संकल्पनेतून बहारदार तालयात्रा
निगडी : पखवाज आणि तबल्याचा आसमंतामध्ये भरुन राहिलेला दमदार सूर, त्याला लालित्यपूर्ण नृत्याची साथ आणि या संपूर्ण संरचनेचे मर्म उलगडून सांगणारे तालयोगी असा बहारदार त्रिवेणी संगम तालयात्रेच्या निमित्ताने रसिकांनी अनुभवला. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या एकोणिसाव्या स्वरसागर महोत्सवात तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांनी पंचवीस सहकलाकारांसह सादर केलेल्या बहारदार तालयात्रेत रसिक तल्लीन झाले.
ताल, लय यांचा अपूर्व संगम!
पूर्णानगर येथे चार दिवसीय स्वरसागर महोत्सवाला प्रारंभ झाला. शुक्रवारी ज्येष्ठ तबलावादक तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांनी त्यांच्या संकलप्नेवर आधारित तालयात्रा हा एक अनोखा कार्यक्रम सादर केला. यात त्यांच्यासह विविध वादक व नर्तक असे एकूण पंचवीस सहकलाकार सहभागी होते. ताल, लय, गायन आणि नृत्य यांचा अपूर्व संगम असलेल्या या बहारदार प्रस्तुतीची सुरुवात राग हंसध्वनी, ताल धमारातील गणेशस्तुतीने झाली. शिवपरण, गणेशपरण यांचा अद्भुत संगम असलेले पखवाज आणि कथ्थक नृत्यातील तोडे, परण यांनी सजलेले हे वादन व नर्तन रसिकांना मंत्रमुग्ध करुन गेले.
लयकारीचे वैशिष्ट्य सांगितले!
त्यानंतर झपतालातील बिंदादीन महाराजांची शाम छबी अति बध ही विख्यात रचना सादर करण्यात आली. यातील लयकारी अवघड असते पण क्लिष्ट नाही असे याची वैशिष्ट्य यावेळी सुरेशजींनी समजावून सांगितले. राग सोहनीमधील आडाचौतालातील गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर यांनी रचलेली चलो हटो पिया अब निक नाओ ही अष्टनायिकांपैकी खंडिता ही नायिका प्रस्तुत करणारी देखणी रचना सादर केली. या बहारदार तालयात्रेमध्ये दमदार बहारदार गायन विनय रामदासन, नागेश आडगावकर यांनी केले. या नृत्य, वादन व गायन मैफिलीत लालित्यपूर्ण कथ्थक नृत्ये सादर केली, नृत्यकलाकार अस्मिता ठाकूर, शीतल काळगे, अमृता गोगटे, आयुषी दीक्षित, रजत पवार, गौरी स्वकुळ यांनी सादर केली.
राकेश चौरसिया यांचे बासरी वादन
स्वरसागर महोत्सवातील शुक्रवारच्या दुसर्या सत्रात ज्येष्ठ बासरीबादक पं. हरिप्रसाद चौरसिया यांचे शिष्य व पुतणे राकेश चौरसिया यांचे सुमधूर बासरीवादन झाले. त्यांनी राग जोग मधील बंदिश यावेळी सादर केली. कृष्णाच्या लडिवाळ बासरीचे मंत्रमुग्ध करणारे स्वर त्यांनी आसमंतात भरुन टाकले होते. बासरी वादनाचा शेवट एका पहाडी धूनने केला. त्यांचे कधी संपूच नये असे वाटणार्या या बासरीवादन रसिकांची टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. यावेळी सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, नगरसेवक विलास मडिगेरी, नगरसेविका अश्विनी बोबडे, योगिता नागरगोजे, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य अमित गोरखे, संयोजक व सहशहर अभियंता प्रवीण तुपे, सहसंयोजक संजय कांबळे, सुरेखा कुलकर्णी आदी उपस्थित होते.