शिंदखेडा (प्रतिनिधी)– येथील स्वराज्य प्रतिष्ठान च्या वतीने पर्यावरण पुरक गणेश मुर्ती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. आपल्या हाताने बाप्पाची मुर्ती साकारायला शिकुया या उद्देशाने नंदुरबार येथील वीर क्रिएटिव्हीटी चे कुणाल वीर यांनी प्रत्यक्ष प्रात्यक्षिकद्वारा सहभागी विद्यार्थांना शाडुमाती पासून गणेश मुर्ती तयार करण्याविषयी मार्गदर्शन केले. शहर व परिसरातील जवळपास शंभर विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. सर्व सहभागी विद्यार्थांना शाडुमाती आयोजकांनी पुरवली.सुरुवातीला वृक्षाला पाणी वाहुन मान्यवरांच्या हस्ते कार्यशाळेचा शुभारंभ करण्यात आला. हयावेळी प्रमुख अतिथी म्हणून नगरपंचायतीचे मुख्याधिकारी प्रशांत बिडगर, वीर क्रिएटिव्हीटीचे मार्गदर्शक कुणाल वीर, स्वराज्य प्रतिष्ठानचे अमोल मराठे, कलाशिक्षक अय्युब मन्सुरी ( विखुर्ले हाय.) अतुल मराठे ( गर्ल्स हाय ) स्वामी समर्थ केंद्राचे प्रशांत भामरे उपस्थित होते. हयावेळी मुख्याधिकारी प्रशांत बिडगर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, प्लास्टर ऑफ पॅरिस पासून तयार केलेल्या गणेशाच्या मूर्ती पाण्यामध्ये विरघळत नसल्याने पाण्याची पातळी कमी झाल्यावर त्या तशाच जमिनीवर राहतात. अशा मूर्ती पाण्याचे प्रदूषण करून पर्यावरणाला घातक ठरतात. त्यामुळे शाडू माती पासून तयार केलेली मूर्ती पर्यावरण पूरक असून विद्यार्थ्यांनी घराघरात या गणेशाच्या मूर्तीची स्थापना करावी असे आवाहन त्यांनी केले. प्रास्ताविक स्वराज्य प्रतिष्ठान चे अमोल मराठे यांनी केले.सुत्रसंचालन नंदकिशोर सोनवणे यांनी केले.कार्यशाळा यशस्वीतेसाठी स्वराज्य प्रतिष्ठानचे पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.