स्वस्त,दर्जेदार संशोधनासाठी शिक्षणसंस्थांनी पुढाकार घ्यावा

0

पुणे। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता आणि बुद्धिमत्ता ठासून भरलेली आहे. त्यांच्यातील या बुद्धिमतेला चालना दिली, तर मोठ्या प्रमाणात नवनिर्मिती होऊ शकते. त्यामुळे शिक्षणसंस्थांनी स्वस्त आणि दर्जेदार इनोव्हेशनसाठी पुढाकार घेतला पाहिजे. केजे शिक्षणसंस्थेने संशोधन आणि नवनिर्मितीचा चालना देत सकारात्मक पाऊल टाकले आहे, असे प्रतिपादन नुकताच ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी केले.

केजे एज्युकेशनल इन्स्टिट्यूटच्या ट्रिनिटी अकॅडमी ऑफ इंजनिअरिंगमध्ये सेंटर ऑफ एक्सलन्स अँड इनोवेशन लॅब’चे उद्घाटन डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते झाले. यावेळी गुणवत्तापर्ण शिक्षण व देशाच्या सामाजिक-आर्थिक विकासात संशोधन आणि नवनिर्मितीची आवश्यकता या विषयावरील बीजभाषणात डॉ. माशेलकर बोलत होते. याप्रसंगी केले शिक्षणसंस्थेचे संस्थापक कल्याण जाधव, खजिनदार विनोद जाधव, व्यवस्थापकीय संचालक हर्षदा जाधव, कार्यकारी संचालक डॉ. हेमंत अभ्यंकर, ट्रिनिटी अकॅडमीचे प्राचार्य डॉ. विजय वढाई, पुणे विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजनेचे शिवाजी पाचर्णे आदी उपस्थित होते.

डॉ. रघुनाथ माशेलकर म्हणाले, शिक्षण हेच उद्याचे भविष्य आहे. समाजाच्या गरजा ओळखून त्याप्रमाणे नवनवीन संशोधन व्हायला हवे. उच्च इच्छाशक्ती, कठोर मेहनत, सहनशीलता, संधी निर्माण करण्याची क्षमता, ध्येयनिश्चिती, कुतूहलता अंगी बाळगून सातत्याने नवनिर्मितीचा ध्यास घेतला पाहिजे. आपण केलेली नवनिर्मिती स्वस्त, दर्जेदार आणि समाजाला उपयुक्त ठरेल, यावर भर दिला पाहिजे. सध्याची पिढी मायक्रोसॉफ़्ट, गुगल भारतनिर्मित असाव्यात, अशी धारणा ठेवणारी आहे. त्यामुळे या पिढीकढुन अनेक चांगली इनोव्हेशन्स होतील, अशी आशा वाटते.