पारोळा पोलिसांची गुप्त माहितीनुसार कारवाई ; लवकरच रॅकेटचा होणार उलगडा
पारोळा- तालुक्यातील बहादरपूर येथील काही नागरीकांजवळ चोरी झालेल्या व कागदपत्र नसलेल्या दुचाकींची विक्री झाल्याची गुप्त माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन सानप यांना मिळाल्यानंतर त्यांनी त्याबाबत चार वाहनधारकांची खोलवर चौकशी केल्यानंतर त्यांनी चार दुचाकी पोलिसांना मंगळवारी काढून दिल्या. अवघ्या 15 ते 20 हजारात भामट्याने या दुचाकी नागरीकांना विकून पोबारा केला असून यामागे मोठे रॅकेट असल्याची शक्यता असून लवकरच त्याचा उलगडा होण्याची शक्यता आहे. पारोळा पोलिस लवकरच दुचाकींच्या मूळ मालकाची ओळख पटण्यासाठी जळगाव प्रादेशिक परीवहन विभागाला चेचीस व इंजिन क्रमांक कळवणार असल्याचे सहा.निरीक्षक सानप म्हणाले.
गुप्त माहितीनुसार कारवाई ; चार दुचाकी जप्त
बहादरपूर गावातील काही लोकांनी अल्प किंमतीत दुचाकी घेतल्याची व त्याबाबत संबंधितांकडे कागदपत्रे नसल्याची माहिती पारोळा पोलिसांनी मिळाल्यानंतर त्यांनी खातरजमा केली असता ही बाब उघड झाली. वाहन धारकांच्या चौकशीअंती त्यांना परजिल्ह्यातील एका भामट्याने या दुचाकी स्वस्तात विकल्याची कबुली दिली. पोलिसांनी चारही दुचाकी पोलिस ठाण्यात आणल्या आहेत. लवकरच आरोपीच्या मुसक्या आवळल्या जाणार असून त्या माध्यमातून वाहन चोरी करणार्या रॅकेटचा उलगडा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक दत्ता शिंदे, चाळीसगाव विभागाचे अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखली सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन सानप यांच्यासह उपनिरीक्षक अजित देवरे, उपनिरीक्षक जितेंद्र खैरनार, नाईक सुनील साळुंके, नरेंद्र गजरे, मोतीलाल बोरसे, राहुल कोळी, कॉन्स्टेबल भोला भोई आदींच्या पथकाने केली.