स्वस्त कॉपरच्या बहाण्याने कोल्हापूरच्या व्यापार्‍याला पाच लाखात लूटले

0

निजामपूर पोलिसात 12 लोकांविरुद्ध गुन्हा दाखल; टोळीचा संशय

धुळे प्रतिनिधी– स्वस्तात कॉपर देण्याच्या बहाण्याने कोल्हापूरच्या व्यापार्‍याला निजामपूर गावाजवळील निर्जनस्थळी बोलावून लाठी-काठीचा धाक दाखवत पाच लाखात लूटल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. या प्रकरणी गुरुवारी पहाटे निजामपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकारामागे मोठी टोळी कार्यरत असल्याचा संशय असून या टोळीने अनेकांना गंडवल्याची शक्यता आहे.

निर्जनस्थळी बोलावून लूट

कोल्हापूर येथील नीलेश माणिक सातवेकर (30, रा.कोल्हापूर) यांचा ट्रेडींगचा बिजनेस असून त्यांना मानगाव-महाड येथील एकाने साक्री तालुक्यात कमी किंमतीत कॉपर मिळवून देण्याचे आमिष दिले. सातवेकर यांच्यासह त्यांचा मित्र तथा कोल्हापूर क्रीडा संघघटनेचे जिल्हाध्यक्ष व भाजपा महराष्ट्र युवा कार्यकारिणी सदस्य महेश मोरे हे 3 रोजी निजामपूर जवळील 103 नंबरच्या पवन चक्कीजवळ आल्यानंतर आरोपींनी त्यांना कॉपर दाखवून 25 लाखात दहा टन कॉपर देण्याचे निश्चित केले. आरोपींनी एकाची पवनचक्कीचे साईट इन्जार्च असल्याची ओळखदेखील करून दिली. 4 रोजी पैसे देण्याचे ठरल्यानंतर तक्रारदार सातवेकर यांच्यासह मोरे हे साक्री येथे पोहोचल्यानंतर संशयीतांनी त्यांना पुन्हा 20 किलोमीटर यावे लागेल म्हणून सांगत पेठला शिवारात टॉवर क्रमांक 117 जवळ बोलावून त्यांच्याजवळील चार लाख दहा हजारांची रोकड, एक तोळा वजनाची 28 हजारांची चैन व सहा हजारांची घड्याळ बळजबरीने हिसकावत मारहाण करून पोबारा केला. या प्रकरणी सातवेकर यांच्या फिर्यादीनुसार अज्ञात 12 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास उपनिरीक्षक के.एस.सुरवाडे करीत आहेत.