भुसावळ : भुसावळ शहर पोलिसांनी शनिवारी मध्यरात्री गोपनीय माहितीच्या आधारे स्वस्त धान्याची वाहतूक करणारा ट्रक ताब्यात घेतला असून या ट्रकमधील धान्य काळ्या बाजारात विक्रीसाठी जात असल्याचा पोलिसांना संशय आहे. या प्रकरणी रविवारी सुटी असल्याने कुठलीही कारवाई झाली नसलतरी सोमवारी शहर पोलिसांतर्फे भुसावळातील पुरवठा विभागाला पत्र देवून पंचनाम्याचे सोपस्कार करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
स्वस्त धान्य काळ्या बाजारात जात असल्याचा संशय
भुसावळ शहर पोलिसांना शनिवारी मध्यरात्री शहर हद्दीतून जात असलेल्या एका ट्रकमध्ये रेशनचे धान्य काळ्या बाजारात विक्रीसाठी जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार भुसावळ पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, पोलिस निरीक्षक गजानन पडघाण यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विनोद नेवे, चालक शेख जाकीर आदींनी ट्रक आल्यानंतर त्यास ताब्यात घेत शहर पोलिस ठाण्यात आणला. ट्रकमध्ये संपूर्ण धान्य भरले असल्याने सोमवारी महसूल विभागाच्या अधिकार्यांच्या उपस्थितीत धान्याची तपासणी होईल त्यात ट्रकमधील धान्य रेशनचे निघाल्यास व त्याची काळ्या बाजारात वाहतूक होत असल्यास गुन्हा दाखल करण्यात येईल, असे पोलिस सूत्रांनी सांगितले.
महसूल व पोलिसांची मिलीभगत
भुसावळसह जळगाव जिल्ह्यात स्वस्त धान्याची काळ्या बाजारात विक्री करणारे रॅकेट सक्रिय आहे. रेशन मालाचा काळाबाजार होण्यासाठी पोलिस व महसूल प्रशासनाचा छुपा वरदहस्त असल्याचा आरोपही आहे. स्वस्त धान्याचा ट्रक चुकून पकडला गेलाच तर अशावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीची धान्य खरेदीची पावती दाखवली जाते व कायदेशीर पळवाटा काढून ट्रकही सोडवला जातो, अशीदेखील चर्चा आहे. भुसावळ, जामनेर, रावेरमार्गे बर्हाणपूरपर्यंत स्वस्त धान्याचा काळाबाजार करणारी यंत्रणा कार्यरत असल्याची चर्चा आहे.