स्वस्त धान्यावर कमिशन वाढले

0

मुंबई । राज्यातील रास्त भाव दुकानदारांना ए.पी.एल. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील प्राधान्य गट व अंत्योदय अन्न योजना अंतर्गत गहू, तांदूळ, साखर व भरड धान्याच्या वितरणासाठी सध्या मिळत असलेल्या 70 रुपये प्रती क्विंटल या मार्जिनमध्ये 80 रुपये इतकी वाढ करुन त्यांना.150 रुपये प्रती क्विंटल याप्रमाणे मार्जिन देण्याचा शासन निर्णय आज जाहीर करण्यात आला आहे. प्रस्तावित वाढीव दराने मार्जिन ही अन्नधान्य व साखर विक्री ऑनलाईन व्यवहाराद्वारे करणार्‍या रास्तभाव दुकानदारांनाच लागू करण्यात येईल . त्यामुळे धान्य दुकानदारांना दिलासा मिळाला आहे.

शासकीय धान्य, रॉकेल व अन्य साहित्य शिधापत्रिकाधारकापर्यंत पोचवण्यासाठी शासनाने परवाने दिले आहेत. राज्यातील 51 हजार 215 अधिकृत रास्त भाव दुकाने आहेत. त्यांच्यामार्फत धान्य पोचवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. जे परवानाधारक धान्य विक्रेते आहेत. धान्यातील घट, तूट, व्यावसायिक कर, दुकानातील कर्मचार्‍यांना देण्यात येणारी मजुरी, वाहतुकीचा खर्च, मजुरांचा खर्च, सक्षम प्राधिकार्‍याकडून आकारण्यात येणारे अनुज्ञेय शुल्क, नूतनीकरण शुल्क, लाइट बिल, दुकानाचा देखभाल-दुरुस्ती, नोंदणी शुल्क आदींसह अन्य बाबींवर होणार्‍या खर्चाचा विचार करून मार्जिन वाढवावे, अशी मागणी राज्यातील रास्तभाव दुकानदारांच्या संघटनांकडून करण्यात आली होती. त्याची दखल घेऊन शासनाने हा निर्णय घेऊन आज त्याचा निर्णय जाहीर केला आहे.