स्वस्त धान्य दुकानात रेशन मिळेना

0

चिखली। येथील परिसरात स्वस्त धान्य दुकानदारांच्या मनमानी कारभाराचा फटका ग्राहकांना बसत असून, महिन्यातून केवळ पंधरा दिवसच धान्य वाटप केले जात आहे. त्यामुळे ग्राहकांची गैरसोय होत असून त्यामुळे बराच ग्राहकांना धान्य मिळेनासे झाले आहे. पुरवठा विभागाच्या अधिकार्‍यांनी या प्रकाराकडे लक्ष देऊन कामात अनियमितता करणार्‍या रेशन दुकानदारांची चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

ग्राहकांची संख्या जास्त असल्याने अडचण
चिखली परिसरातील मोरेवस्ती कुदळवाडी, जाधववाडी तसेच चिखली गावठाण आदी भागात पूर्वी 5 ते 6 स्वस्त धान्य दुकानातून धान्य वितरित होत असे. यातील काही दुकानदारांनी काही कारणांमुळे आपापली दुकाने बंद केली असल्याकारणामुळे कित्येक कार्डधारकांचे रेशन बंद झाले आहे. तर काही कार्डधारकांना इतर दुकानदारांकडे वर्ग करण्यात आले आहे. तसेच नवीन नोंदणी करणार्‍या कार्डधारकांनाही तलाठी कार्यालयातून रेशनिंगसाठी याच दुकानदारांकडे पाठवले जाते. यामुळे आधीच कार्डधारकांची संख्या जास्त असल्याने सदर दुकानांवर अतिरिक्त कार्डधारकांना धान्य पुरविणे अवघड होत आहे. नवीन कार्डधारकांना धान्यसाठा नसल्याचे सांगून रेशनिंग देण्यास नकार दिला जातो. काही दुकानदार युनिट प्रमाणे धान्य वाटप करत नसल्याच्या तक्रारी ग्राहक करत आहेत. कित्येक ग्राहकांना तुमचे रेशन वरून बंद केले असल्याची सबब सांगितली जाते. सध्या चिखलीत दोन दुकांनामार्फत धान्य वाटप केले जात आहे. मात्र, या दुकानांतून महिन्यातून केवळ पंधराच दिवस धान्य वाटप केले जात असून दुकानदार त्यांच्या सवडीनुसार वेगवेगळ्या वेळेत धान्य वाटप करत आहेत. त्याचा फटका ग्राहकांना बसत असल्याची तक्रार आहे.