स्वाइन फ्लूचे आठ रुग्ण

0

पुणे । शहरात शुक्रवारी स्वाइन फ्लूचे आठ रुग्ण आढळले. जानेवारीपासून आत्तापर्यंत 81 रुग्णांचा व राज्यात 390 पेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. स्वाइन फ्लूचे सर्वाधिक मृत्यू पुण्यात झाले आहेत. स्वाइन फ्लूची साथ आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकारने एच 1 एन 1 या विषाणुंच्या संसर्गाला प्रतिबंध करणार्‍या सव्वा लाख लसींची खरेदी प्रक्रिया सुरू केली आहे. तसेच पालिकांनीही त्यांच्या पातळीवर ही लस खरेदी करण्याची सूचना आरोग्य खात्याने केली आहे. त्यानुसार पुणे महापालिकेत 4 हजार लस उपलब्ध करण्यात आल्या असून या लस रुग्णांना मोफत देण्यास सुरुवात झाली आहे.

सध्या 24 रुग्णांची परिस्थिती गंभीर असून ते व्हेंटिलेटरवर आहेत. शहरात रोज आठ ते नऊ रुग्ण स्वाइन फ्लू बाधित आढळत आहेत. शहरात 42 रुग्ण उपचार घेत आहेत. स्वाइन फ्लूचा वाढता प्रभाव नियंत्रीत करण्यासाठी आतापर्यंत 4 हजार स्वाइन फ्लू प्रतिबंधक लस खरेदी करण्यात आली असून आवश्यकता भासल्यास अजून लस खरेदी करण्यात येणार असल्याची माहिती उपआरोग्य प्रमुख डॉ. अंजली साबणे यांनी दिली. शुक्रवारी 3 हजार 54 रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 183 संशयित रुग्णांना टॅमिफलूच्या गोळ्या देण्यात आल्या. 18 रुग्णांचे घशातील स्त्रावाचे नमुने तपासण्यात आले. नुकतेच सात रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे नागरीकांना घाबरण्याची गरज नसल्याचे आवाहन पुणे पालिकेने केले आहे.