स्वाइन फ्लूने सांगलीत तरुणाचा मृत्यू

0

तासगाव । मुंबई शहराला स्वाइन फ्लूचा विळखा वाढत चालला असताना आता स्वाइन फ्लू आजाराने सांगली जिल्ह्यातही प्रवेश केल्याचे दिसत आहे. सांगली जिल्ह्यात स्वाइन फ्लू आजाराने एका तरुणाचा बळी घेतला आहे. सावळज येथील गोरख रत्नाकर पोतदार (33) या तरुणाचा रविवारी पहाटे सांगलीच्या सिव्हिल रुग्णालयामधील स्वाइन फ्लू नियंत्रण कक्षात उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामुळे जिल्ह्यातील आरोग्य विभाग खडबडून जागा झाला आहे. गोरख पोतदार तरुणाच्या मृत्यूने सावळजमध्ये स्वाइन फ्ल्यूची साथ आली असल्याच्या धास्तीने ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. चार दिवसांपूर्वी सर्दी व ताप आल्याने गोरख पोतदारने गावातील एका खासगी डॉक्टरकडे उपचार घेतले होते. परंतु, त्याचा काहीच उपयोग झाला नाही. त्रास वाढल्याने श्‍वसनात अडचणी निर्माण होऊ लागल्या. यामुळे दोन दिवसांपूर्वी त्याला उपचारासाठी सांगली येथील सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

नियंत्रण कक्षात 2 दिवस उपचार
गोरखला स्वाइन फ्लूची लागण झाली असावी, असा संशय आल्याने डॉक्टरांनी त्याला तातडीने स्वाइन फ्लू नियंत्रण कक्षात हलवले होते. त्याच्यावर दोन दिवसांपासून या कक्षात उपचार सुरु होते. रुग्णालय प्रशासनाने त्याच्या घशातील स्त्रावाचे नमूने तपासणीसाठी पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संस्थेत (एनआयव्ही) पाठवले होते.

शनिवारी रात्री तब्येत खालावली
गोरखची तब्येत स्थिर असल्याचे सिव्हिल रुग्णालयाच्या अधिष्ठाता पल्लवी सापळे यांनी शनिवारी सायंकाळी सांगितले होते. मात्र, रात्रीनंतर त्याची तब्येत अचानक खालावल्याने त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. परंतु, उपचारादरम्यान, गोरखची प्रकृती सुधारली नसल्याने रविवारी पहाटे 1 वाजून 40 मिनिटांनी त्याचा मृत्यू झाला.