स्वाइन फ्लूमुळे राज्यात वर्षभरात २४४ जणांचा मृत्यू

0

मुंबई : संपूर्ण राज्यात स्वाइन फ्लूमुळे वर्षभरात २४४ लोकांना प्राण गमावे लागले आहेत. त्यात नाशिकमध्ये सर्वाधिक ७६ आणि पुण्यात ६४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर केवळ ऑक्टोबर महिन्यातच राज्यात स्वाइन फ्लूने ७५ लोकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहितीही समोर आली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने जारी केलेल्या एका अहवालातून ही माहिती उघड झाली आहे.

राज्यात स्वाइन फ्लूमुळे १८ ऑक्टोबर २०१८ पर्यंत २४४ रुग्ण दगावल्याचं आरोग्य विभागाच्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. स्वाइन फ्लूमुळे नाशिकमध्ये ७६, पुणे शहरात ६४, पिंपरी-चिंचवडमध्ये ३३, साताऱ्यात २८ आणि कोल्हापूरमध्ये १७ लोक दगावले आहेत. याशिवाय स्वाइन फ्लू झाल्याने आणखी ३८ लोक गंभीर आहेत. त्यांना राज्यातील वेगवेगळ्या रुग्णालयात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. पुण्याच्या रुग्णालयांमध्ये २९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

स्वाइन फ्लूमुळे मोठ्याप्रमाणावर लोक दगावल्याचं आरोग्य विभागाचे संचालक संजीव कांबळे यांनीही म्हटलं आहे. तर गेल्या दोन महिन्यांत झालेल्या पावसामुळे स्वाइन फ्लूचा फैलाव अधिक झाल्याने मृतांचा आकडा वाढल्याचं आरोग्य तज्ज्ञांचं म्हणणं आहे. दिवस आणि रात्रीच्या तापमानात चढ-उतार होत असल्याने स्वाइन फ्लूचा फैलाव झाल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. काही केसेसमध्ये उशिरा उपचार मिळाल्याने रुग्ण दगावल्याचं आढळून आलं आहे. २०१७ मध्ये ७७७ लोकांचा मृत्यू झाला होता तर २००९ ते २०१५ या काळात राज्यात ९०५ जण स्वाइन फ्लूने दगावले होते.